पणजी : गोवा क्रिकेट असोसिएशनचा (जीसीए) वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघ आगामी देशांतर्गत क्रिकेट हंगामाच्या पूर्वतयारीसाठी ८ ते १८ ऑगस्टदरम्यान आंतरराष्ट्रीय सराव दौऱ्यासाठी ओमानला रवाना झाला आहे. संघ व्यवस्थापक सिद्धेश देविदास साळुंके आणि मुख्य प्रशिक्षक दिनेश मोंगिया यांच्या नेतृत्वाखाली हा संघ ओमानमध्ये विविध आंतरराष्ट्रीय व स्थानिक संघांविरुद्ध सराव सामने खेळणार आहे.
आगामी रणजी करंडक आणि इतर देशांतर्गत स्पर्धांच्या दृष्टीने खेळाडूंना दर्जेदार सामन्यांचा अनुभव मिळवा, संघसंयोजन मजबूत व्हावे आणि खेळाडूंची कामगिरी अधिक प्रभावी व्हावी, या उद्देशाने जीसीएने या आंतरराष्ट्रीय दौऱ्याचे आयोजन केले आहे.
संघ रवाना होण्यापूर्वी गोवा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष व माजी रणजीपटू महेश देसाई, सचिव तुळशीदास शेट्ये, खजिनदार अब्दुल माजिद आणि व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी खेळाडूंची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. गोव्याचे प्रतिनिधित्व करताना उत्कृष्ट खेळ, शिस्त आणि क्रीडाभावना जपावी, असे आवाहन पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंना केले.
गोवा क्रिकेट संघ, सपोर्ट स्टाफ
स्नेहल कवठणकर, मंथन खुटकर, दर्शन मिसाळ, मोहित रेडकर, दीपराज गावकर, शुभम तारी, विकास, चिगुरुपती वेंकट, अभिनव तेजराणा, यश कसवणकर, शिवेंद्र भुजबळ, सुयश प्रभुदेसाई, सनथ नेवगी, चित्तेम जीवनकुमार, कौशिक व्ही. आणि फेलिक्स आलेमाव. मुख्य प्रशिक्षक: दिनेश मोंगिया, गोलंदाजी प्रशिक्षक : जनपारेड्डी कृष्णा राव, संघ व्यवस्थापक : सिद्धेश देविदास साळुंखे, फिजिओ: कीगन मिनेझिस, ट्रेनर्स व विश्लेषक: निनाद पावसकर (ट्रेनार), अमीर शेट्ये (व्हिडिओ विश्लेषक), विशेष उपस्थिती: जीसीएचे उपाध्यक्ष परेश फडते हेसुद्धा संघासोबत ओमानला गेले आहेत.


