मडगाव : पावसाळ्यात रस्ते खोदकामामुळे सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन दक्षिण गोवा जिल्ह्यात सर्व प्रकारच्या रस्ते खोदकामांवर ५ ऑक्टोबरपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात आदेश जारी केला असून, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पावसाळ्यात रस्ते खोदल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होण्यासोबतच आपत्कालीन सेवांच्या हालचालींवर परिणाम होऊ शकतो. तसेच खोदलेल्या रस्त्यांमुळे रस्त्यांची दुरवस्था होऊन नागरिकांच्या जीवितास आणि मालमत्तेला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.अत्यावश्यक सेवांच्या दुरुस्तीसाठी या बंदीत काही प्रमाणात अपवाद ठेवण्यात आला आहे. एखाद्या ठिकाणी पाणीपुरवठा, सांडपाणी वाहिनी, वीज, दूरसंचार किंवा गॅस पाइपलाइन यांसारख्या अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्यास त्यांच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी विशेष परिस्थितीत रस्ता खोदण्याची परवानगी दिली जाऊ शकते.
अशा कामांसाठी संबंधित प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्य अभियंत्यांकडे सादर करावा लागेल. त्यानंतर केवळ तातडीच्या आणि आवश्यक प्रकरणांनाच अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे शिफारस केली जाणार आहे.पावसाळ्यात रस्ते खोदकामामुळे निर्माण होणारे अपघाताचे धोके, वाहतूक कोंडी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने हा आदेश जारी केला आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामे वगळता कोणत्याही प्रकारचे रस्ते खोदकाम ५ ऑक्टोबरपर्यंत करता येणार नाही.
दरम्यान, या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक व त्यावरील दर्जाचे पोलीस अधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी, उपजिल्हाधिकारी आणि उपविभागीय दंडाधिकारी यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कारवाई
संबंधित क्षेत्रातील उपजिल्हाधिकारी व उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना नियमांचे उल्लंघन होत असलेल्या ठिकाणांची पाहणी करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. तसेच तक्रार नोंदवून संबंधित पोलीस ठाण्यामार्फत थेट गुन्हा दाखल करण्याची कार्यवाहीही करता येणार आहे.


