साप्ताहिकी - या आठवड्यात घडलेल्या ठळक घडामोडी

एसटी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा; तर लैंगिक अत्याचार प्रकरणात तेजपाल दोषी

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
08th August, 08:58 pm
साप्ताहिकी - या आठवड्यात घडलेल्या ठळक घडामोडी

पणजी : गोवा विधानसभेत अनुसूचित जमाती (एसटी) समाजाला राजकीय आरक्षण देण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. वेळसांव येथे रेल्वे विकास निगम लिमिटेड (आरव्हीएनएल)ने दुपदरी रेल्वेमार्गाचे काम पुन्हा सुरू झाले. लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘तेहलका’चा माजी संपादक तरुण तेजपाल याची सत्र न्यायालयाने केलेली निर्दोष मुक्तता रद्द करत उच्च न्यायालयाने त्याला दोषी ठरवले. या आठवड्यातील घडामोडींचा घेतलेला आढावा.

रविवार


गावातील जमीन बाहेरच्या व्यक्तींना न विकण्याचा अडवईवासीयांचा निर्धार

गावाचे अस्तित्व, सांस्कृतिक वारसा, सामाजिक एकात्मता, नैसर्गिक पर्यावरण आणि भावी पिढ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने श्री शांतादुर्गा देवस्थानच्या प्रांगणात अडवई सत्तरी गावातील सर्व समाजबांधवांची विशेष ग्रामसभा पार पडली. सभेत गावातील कोणतीही जमीन, घर, प्लॉट किंवा इतर मालमत्ता गावाबाहेरील व्यक्ती अथवा संस्थेला विक्री न करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

नावेलीतही ३९ ए अंतर्गत प्रकल्पांना विरोध

नावेलीच्या ग्रामसभेत कचरा प्रश्नासह रस्त्याशेजारी बसणाऱ्या विक्रेत्यांचा व खराब रस्त्यांचा प्रश्न चर्चेला आला. पंचायतीने मेगा प्रकल्पाला विरोध केला आहे. ३९ ए कलमाअंतर्गत जे प्रकल्प पंचायतीकडे मंजुरीसाठी येतात, त्यांना मंजुरी न देण्याचा ठराव पंचायतीने घेतलेला आहे. तसेच खासगी वीज वितरण कंपनी टाटा पॉवरतर्फे मागण्यात आलेली परवानगीही न देण्याचा निर्णय घेण्यात आला.

बलात्कार प्रकरणी दोघे निर्दोष

बलात्कार प्रकरणांतील दोघा संशयितांना मेरशी येथील जलदगती न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. एका प्रकरणात पीडितेनेच खटला पुढे चालवण्यास नकार दिला, तर दुसऱ्या प्रकरणात पीडितेने गर्भपाताचा केलेला दावा सिद्ध होऊ शकला नाही. दोन्ही निवाडे न्या. डॉ. पूजा कवळेकर यांनी दिले.

सोमवार


म्हापशातील युवकाचा बेळगावमधील धबधब्याच्या जलाशयात बुडून मृत्यू

बेळगाव जिल्ह्यातील एका धबधब्यावर बुडून बिल्वान पेडे म्हापसा येथील सुमेध सुरेश ताळगावकर (३८) या युवकाचा मृत्यू झाला. सदर युवक हा आपल्या तीन मित्रांसोबत पर्यटन तसेच स्वत:च्या बुलेट मोटारसायकलच्या दुरुस्तीसाठी बेळगावमध्ये गेला होता.

म्हापशात दुचाकी चोराला अटक

धुळेर येथून चोरीस गेलेली दुचाकी म्हापसा पोलिसांनी जप्त केली आहे. याप्रकरणी ज्योती बंधन यादव (५२, रा. खोब्रावाडा कळंगुट व मूळ उत्तरप्रदेश) याला अटक केली.

४.३७ कोटींच्या अफरातफरप्रकरणी १.२२ कोटींची मालमत्ता जप्त

आसगाव येथील सुखा या रेस्टॉरन्टमध्ये ४.३७ कोटींची अफरातफर झाली होती. यात संशयित आरोपी गुलशन कुमार सिंग (रा. दिल्ली) याच्याकडून रकमेतून खरेदी केलेली १.२२ कोटींची स्थावर आणि जंगम मालमत्ता हणजूण पोलिसांनी जप्त केली आहे. न्यायालयाच्या मान्यतेने पोलिसांनी मालमत्तेची जप्ती करणारी कारवाई केली आहे.

मंगळवार

ज्येष्ठ नाट्यलेखक रमाकांत पायाजी यांचे निधन

पेडणे तालुक्यातील माईण कोरगाव येथील ज्येष्ठ नाट्यलेखक, नाट्य कलाकार आणि दिग्दर्शक रमाकांत पायाजी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते काही दिवसांपासून आजारी होते. निधनाच्या वेळी ते दोडामार्ग येथे आपल्या मुलीकडे वास्तव्यास होते. त्यांच्या निधनामुळे गोव्याच्या साहित्य, नाट्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

सिकेरीतील काश्मीर हाऊसमधून लाखोंच्या वस्तू लंपास

सिकेरी, कांदोळी येथील काश्मीर हाऊसच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या सहा सुरक्षारक्षकांनीच संगनमताने लाखो रुपयांच्या सोने, चांदी व रत्नजडित मौल्यवान वस्तूंची अफरातफर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कळंगुट पोलिसांनी मेसर्स जीफोरएस सिक्युअर सोल्यूशन (इंडिया) प्रा. लि. या कंपनीच्या सहा सुरक्षारक्षकांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे.

करासवाडा जंक्शनवर चार वाहनांचा साखळी अपघात

राष्ट्रीय महामार्गावरील करासवाडा जंक्शनजवळ एका पादचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे चार वाहनांचा विचित्र साखळी अपघात झाला. अचानक रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला वाचवण्यासाठी चालकाने ब्रेक दाबताच मागून येणारी कदंबा बस, कार आणि पिकअप वाहन एकामागोमाग एक धडकली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

कळंगुटमध्ये दारूच्या नशेत हाणामारी; जखमीचा मृत्यू

कळंगुट समुद्रकिनारी दारूच्या नशेत झालेल्या वादातून झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या शेख समीर (२९, मूळ रा. फरदापूर, महाराष्ट्र) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी कळंगुट पोलिसांनी खुनाचा आणि चोरीचा गुन्हा दाखल करत चार जणांना अटक केली आहे.

बुधवार

वेळसांव येथे दुपदरी रेल्वेमार्गाचे काम पुन्हा सुरू

वेळसांव येथे रेल्वे विकास निगम लिमिटेड (आरव्हीएनएल)ने दुपदरी रेल्वेमार्गाचे काम पुन्हा सुरू केल्याने परिसरातील सुमारे २० घरांचा रस्ता पूर्णपणे बंद होण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणात संबंधित प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून योग्य तोडगा काढावा, अशी मागणी काही ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.

बेतुल येथील अपघाती मृत्यूप्रकरणी सबळ पुराव्याअभावी युवकाची मुक्तता

बेतुल येथे २०२२ मध्ये झालेल्या दुचाकी अपघातात एका व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप असलेल्या जोस्मन शॉन फर्नांडिस (२२, रा. कुडतरी) याची मडगाव प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली.

१४ वर्षीय मुलीवर मातृत्व लादणाऱ्या १९ वर्षीय युवकाला अटक

बार्देश तालुक्यातील मूळ कर्नाटकातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला मातृत्वास भाग पाडल्याप्रकरणी पणजी महिला पोलिसांनी १९ वर्षीय युवकाला अटक केली आहे. संशयिताला म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

गुरुवार 


तरुण तेजपाल याला दहा वर्षांचा सश्रम कारावास

गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी २०१३ मधील लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘तेहलका’चा माजी संपादक तरुण तेजपाल याची सत्र न्यायालयाने केलेली निर्दोष मुक्तता रद्द करत त्याला दोषी ठरवले. न्यायालयाने तेजपाल याला दहा वर्षांचा सश्रम कारावास आणि १० लाख २१ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली असून, पोलिसांना शरण येण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली आहे.

नऊ वर्षीय मुलीवरील अत्याचार प्रकरणी ५४ वर्षीय शेजाऱ्याला जन्मठेप

फोंडा तालुक्यातील एका नऊ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ५४ वर्षीय शेजाऱ्याला बाल न्यायालयाने जन्मठेपेची आणि साडेआठ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. वैद्यकीय अहवाल आणि पीडितेच्या भक्कम साक्षीच्या आधारे न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.

एसटी’ समाजाला राजकीय आरक्षणाचा मार्ग अखेर मोकळा

गोवा विधानसभेत अनुसूचित जमाती (एसटी) समाजाला राजकीय आरक्षण देण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. केंद्र सरकारने ‘गोवा विधानसभा अनुसूचित जमाती (एसटी) प्रतिनिधित्व अधिनियम, २०२५’ ची अधिसूचना जारी केली असून, हा कायदा ६ ऑगस्ट २०२६ पासून राज्यात लागू करण्यात आला आहे. यामुळे आता विधानसभा मतदारसंघांच्या आरक्षणाची प्रक्रिया सुरू होणार आहे.

शुक्रवार 

तोणीर-काजरेधाट धबधब्यावर बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू

सत्तरी तालुक्यातील बंदी असलेल्या सावर्डे पंचायत हद्दीतील तोणीर-काजरेधाट धबधब्यावर शुक्रवारी ट्रेकिंगसाठी आलेल्या वास्कोतील दीपविहार उच्च माध्यमिक विद्यालय, सडा-बायणा येथील राहुल बिंद (१७) या बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून नौदल अधिकाऱ्याला १.१४ कोटींचा गंडा

मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकवण्याची धमकी देत आणि बनावट ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून बार्देश येथील एका नौदल अधिकाऱ्याला १.१४ कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी सायबर विभागाने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

ट्रकला दुचाकीची धडक बसून दुचाकीचालकाचा मृत्यू

आर्लेम नुवे बायपास रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीने मागून धडक दिली. अपघातात दुचाकीचालक दीपक लंगोटे (रा. नुवे) याचा मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रकचालक गवळीराम पावल (रा. पुणे, महाराष्ट्र) याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.

शनिवार

कोरगाव येथे ७.६५ लाखांचे अमली पदार्थ जप्त

पेडणे पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात कारवाई करत कोरगाव येथील मेनवाडा परिसरातील एका भाड्याच्या खोलीवर छापा टाकून सुमारे ७.६५ लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

विद्यार्थ्याच्या धबधब्यावर बुडून मृत्यूप्रकरणी चार शिक्षकांविरुद्ध गुन्हा

सत्तरीतील बंदी असलेल्या तोणीर काजरेधाट येथे धबधबव्यावर पावसाळी सहलीसाठी आलेल्या वास्कोतील विद्यार्थ्यांच्या गटातील राहुल बिंद (१७ वर्षे) या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला होता. याप्रकरणी सुरक्षेत हलगर्जीपणा दाखवल्याप्रकरणी वाळपई पोलिसांनी चार शिक्षकांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे तर दोन टूर ऑपरेटरविरोधात गुन्हा नोंदवून अटक केली आहे.

लक्षवेधी

साईनगर-उसगाव येथील डॉ. रामनाथ पंढरी गावडे (५४, मूळ मंगेशी) यांनी गुरुवारी रात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी त्यांच्या पत्नी हृतिका गावडे यांनी फोंडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

जांबावली येथे ध्यान फाऊंडेशनतर्फे चालवली जाणारी गोशाळा २१ जुलै रोजी मध्यरात्री उद्ध्वस्त करण्यात आली होती. त्यामुळे तिथे असलेल्या १०८ गुरांचे डिचोली येथील सरकारमान्य गोशाळेत स्थलांतर करण्यात आले आहे, अशी माहिती देणारा अहवाल गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला आहे.

गोवा सरकारने हल्लीच आदेश जारी करून डॉ. मेधा साळकर यांच्याकडे आरोग्य सेवा संचालकपदाचा अतिरिक्त ताबा दिला आहे. ही नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा दावा करत डॉ. सलिना नाईक यांनी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात या नियुक्तीलाच आव्हान दिले आहे.

वास्को येथील मंदार सुर्लकर खून प्रकरणातील जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या तीन आरोपींना लवकर मुक्त करण्याचा आदेश गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. राज्य सरकारने या आरोपींच्या सुटकेला दिलेला नकार न्यायालयाने रद्दबातल ठरवला आहे. 

हेही वाचा
सर्व पहा