पणजी : अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणाची अधिसूचना जारी झाल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत एसटी समाजासाठी मतदारसंघ राखीव होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे सध्याचे काही आमदार तसेच प्रस्थापित नेत्यांना मोठा राजकीय फटका बसणार आहे. मतदारसंघ राखीव झाल्यास विद्यमान आमदारांपैकी काही जण निवडणूक लढवण्यासाठी अपात्र ठरतील. दुसरीकडे, माजी आमदार आणि एसटी समाजातील नेत्यांना याचा थेट फायदा मिळून त्यांच्या राजकीय कारकिर्दीचे पुनरुज्जीवन होण्याची चिन्हे आहेत.
२०११ च्या जनगणनेच्या आधारे सांगे, केपे, प्रियोळ आणि नुवे हे चार मतदारसंघ एसटी समाजासाठी राखीव होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
प्रमुख मतदारसंघांतील संभाव्य राजकीय चित्र
सांगे मतदारसंघ : सांगेमध्ये एसटी समाजाची लोकसंख्या सर्वाधिक असल्याने हा मतदारसंघ राखीव होण्याचा दावा केला जात आहे. तसे झाल्यास सध्याचे आमदार व मंत्री सुभाष फळदेसाई निवडणूक लढवण्यास अपात्र ठरतील. येथे माजी आमदार प्रसाद गावकर आणि वासुदेव गावकर हे दावेदार मानले जात आहेत. वासुदेव गावकर यांनी यापूर्वी भाजपच्या तिकिटावर विजय मिळवला असल्याने त्यांना पुन्हा संधी मिळू शकते.
केपे मतदारसंघ: लोकसंख्येच्या प्रमाणानुसार केपे मतदारसंघ राखीव झाल्यास काँग्रेसचे विद्यमान आमदार एल्टन डिकॉस्टा अपात्र ठरतील. अशा वेळी काँग्रेसकडून प्रकाश अर्जुन वेळीप तर भाजपकडून माजी मंत्री प्रकाश शंकर वेळीप यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. सलग तीन वेळा निवडून आलेले प्रकाश शं. वेळीप सध्या राजकारणापासून दूर असून, या आरक्षणामुळे त्यांचे राजकीय पुनर्वसन होऊ शकते.
प्रियोळ मतदारसंघ: प्रियोळ मतदारसंघ राखीव झाल्यास विद्यमान आमदार गोविंद गावडे यांचा उमेदवारीवरील दावा अधिक मजबूत होईल. मात्र, त्यांना मगोपचे सुनील जल्मी यांचे तगडे आव्हान असेल. दुसरीकडे, माजी आमदार आणि मगोप अध्यक्ष दीपक ढवळीकर हे प्रियोळमधून लढण्यास अपात्र ठरतील.
नुवे मतदारसंघ: नुवे मतदारसंघ एसटी राखीव झाल्यास विद्यमान आमदार आलेक्स सिक्वेरा अपात्र ठरतील. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासूनचे या मतदारसंघावरील त्यांचे वर्चस्व संपुष्टात येईल.
काणकोण मतदारसंघ: हा मतदारसंघ राखीव झाल्यास मंत्री रमेश तवडकर ते स्वतः एसटी समाजाचे असल्याने यांच्यावर काहीही परिणाम होणार नाही. मात्र, काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले जनार्दन भंडारी आणि जीसीएचे अध्यक्ष महेश देसाई हे निवडणूक लढवण्यासाठी अपात्र ठरतील.
मतदारसंघ राखीव झाल्यास मी येथून लढू शकणार नाही. पक्षाने ज्याला उमेदवारी दिली त्याच्यासाठी मी काम करेन. मात्र, मी कुडचडे मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी करत असून तेथे संपर्क वाढवणार आहे.
सुभाष फळदेसाई, समाज कल्याण मंत्री


