पणजी : स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत पणजी शहरातील ९८ टक्के प्रकल्प पूर्ण झाले असून आता केवळ एकच प्रकल्प पूर्ण होणे बाकी आहे. तसेच या योजनेअंतर्गत मिळालेल्या अतिरिक्त निधीपैकी ९५ टक्के निधीचा वापर करण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार राज्यमंत्री तोखान सिंह साहू यांनी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे दिली.
लोकसभेत सादर केलेल्या माहितीनुसार, देशभरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत १,६४,८११ कोटी रुपये खर्चाचे एकूण ८,०६४ प्रकल्प हाती घेण्यात आले होते. त्यापैकी १,५६,२५७ कोटी रुपये खर्चून ७,७९० प्रकल्प पूर्ण करण्यात आले आहेत. तसेच केंद्र सरकारने अतिरिक्त आर्थिक सहाय्य म्हणून ४८,००० कोटी रुपये मंजूर केले असून त्यापैकी ४७,४५८ कोटी रुपयांचा वापर झाला आहे.
गोव्यातील पणजी स्मार्ट सिटीसाठी केंद्र सरकारकडून ४९० कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी ४७० कोटी रुपयांचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय पणजी स्मार्ट सिटीअंतर्गत १,०५१ कोटी रुपये खर्चाचे ५१ प्रकल्प मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी १,०४३ कोटी रुपये खर्चून ५० प्रकल्प पूर्ण झाले असून आता केवळ एक प्रकल्प अपूर्ण आहे.
स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रायबंदर कम्युनिटी मार्केट हा एकमेव उर्वरित प्रकल्प असून त्याचे काम सध्या सुरू आहे. या प्रकल्पावर आतापर्यंत सुमारे ८ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.


