पणजी : विकसित भारत - जी राम जी अंतर्गत सर्वोत्कृष्ट प्रकल्पासाठी पंचायतींना पुरस्कार देण्यात येणार आहे. पंचायतींनी गावच्या विकासाचा आराखडा मार्च २०२७ पर्यंत सादर करावा, अशी सूचना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे.
विकसित भारत - जी राम जी अंतर्गत साखळी येथे पंच संमेलन पार पडले. या संमेलनाच्या उद्घाटनात मुख्यमंत्री बोलत होते. पंच, सरपंचांची संमेलनाला उपस्थिती होती. ग्रामीण विकास योजनेअंतर्गत अधिकाधिक लोकांना उपयोगी ठरतील, असे प्रकल्प पंचायतींनी हाती घेतले पाहिजेत. फक्त गटारे बांधण्याचीच कामे होता कामा नये. पंच, सरपंचांनी मिळून गावच्या विकासाचा आराखडा तयार करावा.
हा आराखडा तयार केल्यास प्रकल्प राबविणे सोपे होणार आहे. येत्या दोन महिन्यात पंचायतींनी विविध प्रकल्पांची यादी सादर केली तर नोव्हेंबरपर्यंत प्रकल्पाना मान्यता देणे शक्य होणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. सामुदायिक शेती, तळ्यातील गाळ उपसणे अशी कामे केल्यास त्याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होईल.
महामार्गाच्या बाजूला झाडे लावण्याचे काम सुरू झाले आहे. आता ग्रामीण भागातील रस्त्यांच्या बाजूला पिंपळ, आवळा, कडुनिंब अशी उपयोगी झाडे लावली जातील. यासाठी कंत्राटदारानाची नियुक्ती न करता विकसित भारत - जी राम जी योजने अंतर्गत हे काम केले जाईल. ग्रामीण भागातील रस्ते हरीत करण्याची योजना आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.


