मांडवी पुलाजवळ मालवाहू टेम्पो पलटी; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली

पर्वरी मांडवीपुलानजीक मध्यरात्री रत्नागिरी, दापोलीहून मडगावला मासे घेऊन जाणारा टेम्पो दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात रस्त्यावर घसरून पलटी झाला. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने दोन्ही चालक सुखरूप वाचले आहेत.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
32 mins ago
मांडवी पुलाजवळ मालवाहू टेम्पो पलटी; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली

पणजी : राष्ट्रीय महामार्गावर पर्वरी परिसरात मांडवी पुलाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास एक रस्ता अपघात घडला. महाराष्ट्र राज्यातील दापोली येथून मडगावच्या बाजारपेठेत मासे घेऊन जाणारा एक मालवाहू टेम्पो चालकाचा ताबा सुटल्यामुळे  पलटी झाला. अनियंत्रित झालेल्या या टेम्पोने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 'रेंट-अ-बाईक'ला (दुचाकी) जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. सुदैवाने दोन्ही वाहनांचे चालक सुखरूप बचावले आहेत.




मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, सदर मालवाहू टेम्पो दापोलीहून मडगावच्या दिशेने जात होता. पर्वरी परिसरात पोहोचल्यानंतर महामार्गावरून जाणाऱ्या एका दुचाकी चालकाने अचानक मार्ग बदलल्यामुळे टेम्पो चालकाने अपघात टाळण्यासाठी तातडीने ब्रेक दाबला. मात्र, पावसामुळे रस्त्या निसरडा बनल्याने ब्रेक दाबताच टेम्पो रस्त्यावरून घसरला. यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि अनियंत्रित टेम्पो रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला धडकला. त्यानंतर हा टेम्पो दुभाजक व विजेच्या खांबावर आदळून महामार्गावरच पलटी झाला.

अपघाताचा मोठा आवाज होताच महामार्गावरून प्रवास करणारे इतर वाहनचालक मदतीसाठी घटनास्थळी धावून आले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस पथक तातडीने अपघातस्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तात्काळ वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचे काम हाती घेतले. टेम्पो चालकाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अचानक समोर आलेल्या दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात ब्रेक दाबल्यामुळे गाडी घसरून हा अपघात घडला.

या अपघातात टेम्पोच्या दर्शनी भागाचा आणि दुचाकीचा चक्काचूर झाला आहे. तसेच महामार्गावरील दुभाजक आणि विजेच्या खांबाचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने टेम्पो चालक आणि दुचाकीस्वार दोघांनाही कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. घटनेनंतर पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने पलटी झालेला टेम्पो बाजूला घेऊन विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत केली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून, रात्रीच्या वेळी महामार्गावर वाहने चालवताना योग्य वेग मर्यादा बाळगण्याचे आणि वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा
सर्व पहा