अग्निशामक दलाच्या अत्याधुनिकीकरणावर भर : मुख्यमंत्री

२२.८० कोटींची १८ वाहने दिली अग्निशमन दलाच्या ताफ्यात

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
2 hours ago
अग्निशामक दलाच्या अत्याधुनिकीकरणावर भर : मुख्यमंत्री

पणजी : अग्निशामक दलाचे जवान आपल्या जीवाची पर्वा न करता काम करत असतात. आम्ही सरकारतर्फे अग्निशामक दल तसेच आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या अत्याधुनिकीकरणावर भर देत आहोत. याचाच एक भाग म्हणून आज दलाला १८ वाहने देण्यात आली आहेत. दलाच्या ताफ्यात प्रथमच ४२ मीटर उंच शिडी असणारे वाहन सामील झाले असल्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सांगितले.

मंगळवारी दलाच्या मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संचालक नितीन रायकर व अन्य अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, वाहने खरेदी करण्यासाठी आम्हाला १५ व्या वित्त आयोगाकडून आर्थिक मदत मिळाली आहे. याबाबत मी केंद्र सरकारचे आभार मानतो. अग्नीशामक वाहनांसह आज दलाला दुचाकी आणि हॅझमॅट पद्धतीचे वाहन देखील देण्यात आले आहे.

४२ मीटर उंच शिडी असणारे वाहन मोठ्या इमारतींमधील बचाव कार्यासाठी उपयुक्त पडणार आहे. पावसाळ्यात आपत्ती व्यवस्थापनासाठी या सर्व वाहनांचा उपयोग होणार आहे. राज्यातील सर्व अग्निशामक केंद्र बळकट करण्याचे आमचे ध्येय आहे.

ते म्हणाले, अग्निशामक दलाचे जवान अग्निशमनासोबतच आपत्ती व्यवस्थापनाचे काम देखील करत आहेत. नुकतेच रात्री उशिरा धबधब्यावर अडकलेल्या युवकांना सुखरूप परत आणण्याचे काम दलाच्या जवानांनी केले आहे. दलाच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासोबत आम्ही त्यांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देत आहोत.

यापुढे मडगाव, केपे, फोंडा व अन्य अग्निशामक दलाच्या केंद्रात विविध सुरक्षा उपकरणे आणि वाहने पुरवली जाणार आहेत. याशिवाय वाहतूक कोंडीत अडकू नयेत याकरिता दुचाकी देखील देण्यात येणार आहेत.

रायकर यांनी सांगितले की, थर्ड पार्टी अग्नि सुरक्षा प्रमाणपत्र देण्यासाठी तीन एजन्सींना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. मागील काही वर्षात तीन-चार नवीन अग्निशामक केंद्र स्थापन झाली आहेत. यामुळे सध्या मनुष्यबळ काही प्रमाणात अपुरे पडत आहे.

नवीन भरतीसाठी आम्ही कर्मचारी भरती आयोगाला प्रस्ताव पाठवला आहे. लवकरच दलातर्फे दोन पाणबुडे कंत्राटी तत्वावर घेण्यात येणार आहेत. एक मुख्यालय तर दुसरा मडगावमध्ये तैनात करण्यात येणार आहे. 

२२ कोटींची वाहने 

रायकर यांनी सांगितले की, १८ वाहनांची किंमत सुमारे २२.८० कोटी रुपये आहे. यामधील ११ कोटी रुपये १५ व्या वित्त आयोगाने दिले आहेत. वाहनांमध्ये ८ लहान बंब, ८ दुचाकी आणि प्रत्येकी एक हॅझमॅट व टर्न टेबल लॅडर यांचा समावेश आहे.

धबधब्यांवर काळजी घ्यावी

मुख्यमंत्री म्हणाले की, पावसाळ्यात धबधब्यांवर जाताना सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना अग्निसुरक्षा भत्ता देण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोलवाळ तुरुंगात अमली पदार्थ रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा
सर्व पहा