पणजी : गोमंतक भंडारी समाजातील वाद पुन्हा एकदा पोलीस स्थानकात पोहोचला आहे. समाजाच्या नावाने कथितरित्या अनधिकृत पावती पुस्तके छापून देणग्या गोळा करण्यात आल्याचा आरोप करत ॲड. आतिश मांद्रेकर यांनी संबंधित समितीच्या सदस्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ अंतर्गत गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, काही जणांनी गोमंतक भंडारी समाजाच्या नावाचा कथित गैरवापर करून अनधिकृत पावती पुस्तके छापली. या माध्यमातून देणग्या गोळा करण्यात आल्याचा तसेच त्या निधीच्या संकलन व वापरात अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याशिवाय फसवणूक, विश्वासघात, कटकारस्थान, चुकीचे प्रतिनिधित्व (Misrepresentation) तसेच समाजाच्या नावाचा गैरवापर केल्याचे गंभीर आरोपही तक्रारीत नमूद करण्यात आले आहेत. संबंधितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ मधील लागू तरतुदींनुसार प्रथम माहिती अहवाल (FIR) नोंदवून सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे. दरम्यान, या तक्रारीमुळे गोमंतक भंडारी समाजातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


