वास्को: शहरातील प्रस्तावित अत्याधुनिक बस स्थानक प्रकल्पावरून सध्या गोव्याच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. वास्को शहराच्या भविष्यातील विकासासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी ठरणाऱ्या या प्रकल्पावर काँग्रेस पक्षाने घेतलेल्या भूमिका चुकीची असल्याचे म्हणत वास्कोचे आमदार कृष्णा (दाजी) साळकर यांनी कडक शब्दांत पलटवार केला . काँग्रेस पक्षाला शहराचा किंवा राज्याचा विकास साधण्यापेक्षा केवळ स्वतःची राजकीय पोळी भाजण्यात अधिक रस असल्याचा आरोप साळकर यांनी केला. पर्वरी येथे मंत्रालयातून बाहेर आल्यानंतर त्यांनी मध्यमांशी संवाद साधला.
काँग्रेस पक्षाने नुकतीच एक पत्रकार परिषद घेऊन प्रस्तावित वास्को बस स्थानक प्रकल्पाच्या आराखड्यावर आणि अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. काँग्रेसच्या या भूमिकेचा तीव्र निषेध नोंदवताना आमदार साळकर म्हणाले की, जेव्हा जेव्हा वास्को शहराच्या पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी किंवा सामान्य नागरिकांच्या हिताचे मोठे प्रकल्प अमलात आणण्यासाठी ठोस पावले उचलली जातात, तेव्हा काँग्रेस पक्ष त्यात खोडा घालण्याचे काम करतो.
वास्को शहरातील वाढती लोकसंख्या, वाहनांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या आणि दररोज कामानिमित्त ये-जा करणाऱ्या हजारो प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता, शहराला एका सुसज्ज आणि आधुनिक सुविधांनी युक्त अशा बस स्थानकाची अत्यंत आवश्यकता आहे. हे नवे बस स्थानक आकारास आल्यास शहरात भेडसावणारा वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटण्यास मदत होईल, शिवाय प्रवाशांना अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि सोयीस्कर दळणवळणाची सुविधा उपलब्ध होईल. शहराचा कायापालट करणे आणि स्थानिक नागरिकांना उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा पुरवणे हेच आपले मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
केवळ स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आणि संकुचित राजकीय हितसंबंध जपण्यासाठी काँग्रेस विकासकामांना सातत्याने विरोध दर्शवत आहे. मात्र, अशा कोणत्याही विरोधाला किंवा राजकीय अडथळ्यांना न जुमानता वास्को शहराचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असा ठाम विश्वास आमदार कृष्णा साळकर यांनी व्यक्त केला. जनतेच्या मूलभूत गरजांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणारा काँग्रेस पक्ष विकासप्रक्रियेत अडथळा ठरत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.


