पणजी : मागील दोन दिवस राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. सोमवारी सकाळी पंचवाडी धरण ‘ओव्हरफ्लो’ झाले. मागील वर्षी पंचवाडी धरण २ जुलै रोजी भरले होते. मागील आठवड्यात साळावली आणि गवाणे शंभर टक्के भरले होते. ३ ऑगस्ट रोजी आमठाणे धरण ८५ टक्के, चापोली धरण ६४ टक्के, तर अंजुणे धरण ६६ टक्के भरले होते. तिळारी धरणातून प्रति सेकंद ३२२.१४ घनमीटर (क्युमेकस) पाण्याचा विसर्ग होत आहे.
राज्यात २४ तासात जोरदार पावसाची नोंद झाली. रविवारी रात्री पणजी येथील काही भागात पाणी साचून राहिल्याच्या घटना घडल्या. चोवीस तासात सरासरी १.८८ इंच पावसाची नोंद झाली. हवामान खात्याने पुढील आठवडाभर राज्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. राज्यात १ जून ते ३ ऑगस्ट दरम्यान सरासरी ५४.४४ इंच पावसाची नोंद झाली आहे. यंदा पावसाचे प्रमाण ३२.८ टक्क्यांनी कमी आहे.
वरील कालावधीत धारबांदोडामध्ये ७३.६८ इंच, सांगेमध्ये ७२.३१ इंच, वाळपईमध्ये ७१.५९ इंच, केपेमध्ये ६६.६३ इंच, काणकोणमध्ये ६३.५१, फोंडा मध्ये ५९.६३ इंच तर साखळी मध्ये ५६.०७ इंच पावसाची नोंद झाली आहे. याआधी हवामान खात्याने ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात राज्यात सरासरी पेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त आहे. तर ऑगस्ट महिन्यात कमाल आणि किमान तापमान सरासरी अधिक असण्याची शक्यता आहे.


