बेंगळुरू : मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील कर्नाटक सरकारच्या मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार आज (३ ऑगस्ट) होणार आहे. २० नव्या मंत्र्यांचा दुपारी ४.०५ वाजता शपथविधी पार पडणार आहे. (20 Names Part Of DK Shivakumar Cabinet Expansion In Karnataka). मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळाचा हा पहिलाच मोठा विस्तार आहे. बेळगावातील अथणी मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण सवदी यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार आहे.
या विस्तारात सामाजिक समतोल आणि प्रादेशिक प्रतिनिधित्वाचा विचार करण्यात आला आहे. अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. नव्या मंत्र्यांमध्ये पी. एम. नरेंद्रस्वामी, शिवराज तंगडगी, रुद्रप्पा लामाणी, के. एस. बसवंथप्पा, टी. रघुमूर्ती, मधू बंगारप्पा, पुट्टरंगा शेट्टी, मंकल एस. वैद्य, एन. चलुवराया स्वामी, के. एम. शिवलिंगे गौडा, एच. सी. बालकृष्ण, यात्री शांतगौडा, बसवराज रायरेड्डी, विजयानंद काशप्पनावर, लक्ष्मण सावदी, एस. एस. मल्लिकार्जुन, बी. झेड. झमीर अहमद खान, रिजवान अर्शद, अजय सिंह आणि बी. नागेंद्र यांचा समावेश आहे.
या विस्ताराचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे माजी अनुसूचित जमाती कल्याण मंत्री बी. नागेंद्र यांचे मंत्रिमंडळात पुनरागमन. वाल्मिकी विकास महामंडळ घोटाळ्याशी संबंधित आरोपांमुळे त्यांनी २०२४ मध्ये मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तसेच काँग्रेसमध्ये २०१८ मध्ये प्रवेश केलेले आणि माजी भाजप नेते असलेले नागेंद्र यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.
याशिवाय, बी. झेड. झमीर अहमद खान आणि रिजवान अर्शद या दोन अल्पसंख्याक नेत्यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री धर्मसिंग यांचे पुत्र अजय सिंह यांनाही मंत्रिपदाची संधी मिळाली आहे.
मंत्रिपदाची संधी मिळाल्यानंतर मधू बंगारप्पा यांनी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे आभार मानत, "सिद्धरामय्या यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा अनुभव आता शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालीही राज्याच्या विकासासाठी उपयोगात आणेन," अशी प्रतिक्रिया दिली.
जून महिन्यात मुख्यमंत्रीपदाची धुरा स्वीकारल्यानंतर डी. के. शिवकुमार यांनी मंत्रिमंडळात स्वतःसह जी. परमेश्वर आणि अन्य १२ मंत्र्यांचा समावेश केला होता. आजच्या विस्तारानंतर कर्नाटक मंत्रिमंडळाची एकूण सदस्यसंख्या १४ वरून ३४ इतकी होणार आहे.


