नवी दिल्ली : सणासुदीचा काळ सुरू होण्यापूर्वीच सर्वसामान्यांसह व्यावसायिक क्षेत्रासाठी एक खूशखबर समोर आली आहे. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) १ ऑगस्ट २०२६ पासून १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी (LPG) सिलेंडरच्या दरात तब्बल २०० रुपयांहून अधिक कपात केली आहे. यामुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ढाबे आणि कॅटरिंग व्यवसाय करणाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.
दुसरीकडे, विमान इंधनाच्या (ATF) दरात मात्र प्रति लिटर ५ रुपयांची वाढ करण्यात आली असून, घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
प्रमुख शहरांमधील व्यावसायिक एलपीजीचे नवे दर (१९ किलो):
दिल्ली: सिलेंडर १९२ रुपयांनी स्वस्त होऊन आता ₹२,७३८ ला मिळेल.
कोलकाता: सर्वाधिक २०९ रुपयांची कपात, नवीन दर ₹२,८७२.५०.
मुंबई: १९४ रुपयांची कपात, नवीन दर ₹२,६९१.५०.
चेन्नई: २०० रुपयांची कपात, नवीन दर ₹२,९०६.
पणजी : १९७ रुपयांची कपात, नवीन दर ₹२,८१५
छोट्या व्यापाऱ्यांना आणि स्थलांतरित कामगारांना दिलासा
व्यावसायिक एलपीजीसोबतच ५ किलोच्या 'फ्री ट्रेड एलपीजी' (FTL) सिलेंडरच्या दरातही सुमारे ₹४६.५० ची कपात झाली आहे. दिल्लीत हा ५ किलोचा सिलेंडर आता ₹७६२ ला उपलब्ध होईल. या निर्णयामुळे छोटे विक्रेते आणि कामानिमित्त बाहेर राहणाऱ्या नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.
घरगुती सिलेंडरचे दर जैसे थे
१४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत घरगुती सिलेंडर ₹९४२, कोलकात्यात ₹९६८, मुंबईत ₹९४१.५० आणि चेन्नईत ₹९५७.५० तर गोव्यात ₹९५६ या जुन्याच दरांवर उपलब्ध राहील
विमान प्रवास महागणार?
एकीकडे एलपीजी स्वस्त झाला असला तरी विमान इंधनाच्या (ATF) दरात प्रति लिटर ५ रुपयांची वाढ होऊन तो ₹११५ प्रति लिटर झाला आहे. त्यामुळे येत्या काळात विमान तिकीटदरावर याचा परिणाम दिसू शकतो. पश्चिम आशियातील राजकीय तणाव निवळल्यामुळे जागतिक ऊर्जा बाजारात निर्माण झालेली सुधारणा आणि इंधन पुरवठ्यातील सुलभता यामुळे ही सलग दुसरी दरकपात करण्यात आली आहे.


