पणजी: पहाटेची वेळ... राष्ट्रीय महामार्गावर पसरलेली शांतता... आणि अचानक झालेल्या एका प्रचंड आवाजाने परिसर हादरला! पणजीहून मडगावच्या दिशेने जाणाऱ्या एका फोर्ड इकोस्पोर्ट कार आग लागली. राष्ट्रीय महामार्ग ६६ (NH-66) वर बांबोळी येथील प्रसिद्ध 'फुलांचो खुरिस' (Holy Cross Shrine) जवळ शनिवारी पहाटे घडलेल्या या दुर्दैवी अपघातात एका तरुणाचा होरपळून जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले.
शनिवारी पहाटे सुमारे चार वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, कार अतिशय वेगात असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण पूर्णपणे सुटले. कार महामार्गावरील क्रॅश बॅरियरला जोरदार धडक देऊन थेट सर्व्हिस रोडवर जाऊन आदळली. धडक इतकी भीषण होती की, क्षणात कारच्या इंजिनने पेट घेतला आणि काही मिनिटांतच संपूर्ण कार धगधगत्या आगीच्या गोळ्यात रुपांतरित झाली.
पेटत्या कारमधून दोघांना काढले बाहेर
दुर्घटनेच्या वेळी कारमध्ये तीन तरुण प्रवास करत होते. गाडीला अचानक भीषण आग लागल्याने आत अडकलेल्या तरुणांमध्ये प्रचंड घबराट पसरली. आगीच्या ज्वाळा आणि धुराच्या लोटामुळे एका तरुणाला बाहेर पडता आले नाही आणि त्याचा गाडीतच वेदनादायक अंत झाला. तर गंभीर दुखापत झालेल्या इतर दोन तरुणांना वेळीच बाहेर काढण्यात यश आले.
पोलीस आणि अग्निशामक दलाची तातडीची कारवाई
घटना घडताच पहाटे ४:०१ वाजता पणजी अग्निशामक दलाला (DFES) या अपघाताची माहिती देण्यात आली. अग्निशामक जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाण्याचा मारा करून कारला लागलेली आग पूर्णपणे विझवली. जखमी तरुणांना उपचारासाठी तातडीने बांबोळी येथील 'गोवा मेडिकल कॉलेज' (GMC) मध्ये दाखल करण्यात आले आहे.
अपघाताचे गूढ उकलण्यासाठी सखोल तपास
या संपूर्ण दुर्घटनेबाबत आगशी (Agacaim) पोलीस ठाण्याचे पथक सखोल तपास करत आहे. हा अपघात चालकाला डुलकी आल्याने झाला की वेगावरील नियंत्रण सुटल्याने, याचा शोध पोलीस घेत आहेत. पहाटेच्या वेळी घडलेल्या या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


