मासेमारी हंगामापूर्वी कुटबण जेटीवर अस्वच्छता; आमदार क्रुझ सिल्वांकडून पाहणी

मासेमारी हंगामाच्या पार्श्वभूमीवर आमदार क्रुझ सिल्वा यांनी कुटबण जेटीची पाहणी केली. जेटीवरील अस्वच्छता, स्वच्छतागृहांची दुरवस्था, कामगारांची अपूर्ण नोंदणी आणि साळ नदीतील धोकादायक प्रवासाबाबत त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
12 mins ago
मासेमारी हंगामापूर्वी कुटबण जेटीवर अस्वच्छता; आमदार क्रुझ सिल्वांकडून पाहणी

मडगाव: राज्यात १ ऑगस्टपासून मासेमारी हंगामाला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर वेळ्ळीचे आमदार क्रूझ सिल्वा यांनी कुटबण जेटीला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील मूलभूत सोयी-सुविधांची पाहणी केली. पाहणीदरम्यान जेटीवरील अस्वच्छता, स्वच्छतागृहांची झालेली दुरवस्था आणि कामगारांची अपूर्ण नोंदणी पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मत्स्यव्यवसाय खात्याने आणि सरकारने तातडीने या सुविधांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

या पाहणीदरम्यान आमदार सिल्वा यांनी स्थानिक मच्छीमार, ट्रॉलर मालक आणि कामगारांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सर्व ट्रॉलर नव्या हंगामासाठी सज्ज झाले आहेत; मात्र सध्याच्या हवामानामुळे आणि साळ नदीच्या मुखातून समुद्रात जाण्याचा मार्ग अत्यंत गाळयुक्त व धोकादायक बनल्याने मच्छीमारांनी मोठी चिंता व्यक्त केली आहे. दरवर्षी मच्छीमारांना अशा प्रकारे धोक्याच्या सावटाखालीच समुद्रात उतरावे लागते. सध्याचा मुसळधार पाऊस आणि खवळलेला समुद्र यामुळे १ ऑगस्टला सर्वच ट्रॉलर सुरक्षितपणे समुद्रात उतरू शकतील का, याबाबत साशंकता आहे.

मच्छीमारांच्या सुरक्षेबाबत बोलताना आमदार सिल्वा म्हणाले की, "हंगामासाठी परप्रांतीय कामगार जेटीवर दाखल होत आहेत. मात्र, शुक्रवार दुपारपर्यंत केवळ २८६ कामगारांचीच अधिकृत नोंदणी झाली आहे." यामुळे आगामी काळात मच्छीमारांच्या अडचणीत आणखी भर पडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

याशिवाय जेटीवरील अस्वच्छतेवर बोट ठेवत ते म्हणाले की, मासेमारी हंगाम अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असतानाही जेटीवरील स्वच्छतागृहांची दुरुस्ती आणि स्वच्छता करण्यात आलेली नाही. मत्स्य खात्याने मच्छीमार व कामगारांचे आरोग्य लक्षात घेऊन त्यांना चांगल्या मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी प्राधान्याने काम केले पाहिजे.

पाहणीअंती आमदार क्रूझ सिल्वा यांनी, साळ नदीच्या मुखाकडील मच्छीमारांचा प्रवास सुरक्षित आणि सुलभ व्हावा यासाठी सरकारने तातडीने 'ट्रेनिंग वॉल' उभारण्याचा निर्णय घ्यावा, तसेच मत्स्यखात्याने जेटीवरील स्वच्छतागृहांची दुरुस्ती करून स्वच्छता राखावी, अशी आग्रही मागणी प्रशासनाकडे केली आहे.

हेही वाचा
सर्व पहा