मडगाव: येथील गांधी मार्केट परिसरात आणि आजूबाजूच्या मुख्य रस्त्यांवर बेकायदा फेरीवाले तसेच विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे केली आहेत. त्यामुळे नियमित कर आणि भाडे भरणाऱ्या अधिकृत व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. मडगाव नगरपालिकेने पुढील आठ दिवसांत ही सर्व अतिक्रमणे तातडीने न हटवल्यास गांधी मार्केट पूर्णपणे बंद ठेवून नगरपालिकेवर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा माजी मंत्री बाबू आजगावकर यांनी दिला आहे.
पत्रकारांशी बोलताना आजगावकर यांनी मडगाव पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, गांधी मार्केट परिसरात रस्त्यालगत अनधिकृतपणे बसणाऱ्या फेरीवाल्यांमुळे ग्राहक मुख्य बाजारात येण्याऐवजी रस्त्यावरूनच खरेदी करून निघून जातात. यामुळे पालिकेचा नियमित कर आणि दुकानांचे भाडे भरणाऱ्या प्रामाणिक व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. पालिका प्रशासनाकडून कोणतीही कठोर कारवाई होत नसल्याने या बेकायदा फेरीवाल्यांचे धाडस दिवसेंदिवस वाढले आहे. त्यामुळे पालिकेने येत्या आठ दिवसांत ठोस कारवाई करून रस्त्यावरील अतिक्रमणे हटवावीत, अन्यथा सर्व व्यापारी वर्ग एकत्र येऊन पालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढतील, असा इशारा त्यांनी दिला.
भाजपने उमेदवारी नाकारल्यास पेडणेतून अपक्ष लढणार
आपल्या राजकीय भवितव्याविषयी बोलताना बाबू आजगावकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, "मी सध्या भारतीय जनता पक्षासोबतच कार्यरत आहे. आगामी विधानसभा निवडणूक मी पेडणे मतदारसंघातूनच लढवणार आहे. मात्र, जर पक्षाने मला पेडणे मतदारसंघातून उमेदवारी नाकारली, तर मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार," असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.


