पणजी : गोवा सरकारने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) विद्यार्थ्यांसाठी नवीन योजना अधिसूचित केली आहे. यानुसार विद्यार्थ्यांना नैराश्य, कौटुंबिक समस्या व अन्य मानसिक ताणतणावातून बाहेर काढण्यासाठी विशेष समुपदेशन दिले जाणार आहे. यासाठी कौशल्य विकास खात्यातर्फे प्रत्येक आयटीआयमध्ये एक म्हणजेच एकूण १० समुपदेशकांची नियुक्ती केली जाणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना गोपनीय आणि सुरक्षित वातावरणात आपल्या समस्या मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे.
याबाबत जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, सध्याच्या स्पर्धात्मक युगात स्पर्धा, अभ्यासाचा ताण, पालकांच्या वाढत्या अपेक्षा, सामाजिक-आर्थिक परिस्थितीमुळे अनेक तरुण-तरुणी मानसिक तणाव, भीती, नैराश्य किंवा विविध व्यसनांना बळी पडत असल्याचे समोर आले आहे. काही प्रकरणांमध्ये या मानसिक त्रासामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्येसारखे टोकाचे विचारही निर्माण होतात. राज्यातील शासकीय आयटीआय मध्ये दरवर्षी सुमारे ५ हजार विद्यार्थी प्रवेश घेतात. यातील अनेक जण हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आहेत. या विद्यार्थ्यांना योग्य वेळी मार्गदर्शन व मानसिक आधार देण्यासाठी ही योजना आखली आहे.
यानुसार विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन व मदत केली जाईल. यामध्ये ताणतणाव व्यवस्थापन आणि आयटीआय मधील वातावरणाशी जुळवून घेणे, नैराश्य, चिंता, आणि रागावर नियंत्रण करणे, कौटुंबिक संबंधांतील अडचणी, जीवनातील बदल स्वीकारणे, शारीरिक, लैंगिक किंवा भावनिक शोषणाविरुद्ध मदत व मार्गदर्शक सल्ला देणे, आत्महत्येचे विचार किंवा इतर मानसिक त्रासातून बाहेर पडण्यासाठी सहाय्य करणे आदींचा समावेश आहे. यामुळे विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण देण्यासह त्यांच्या मानसिक आरोग्याचीही योग्य काळजी घेतली जाईल असे अधिसूचनेत म्हटले आहे.


