दामोदर सप्ताहाच्या पूर्वतयारीच्या बैठकीत आमदार कृष्णा साळकर व इतर सरकारी अधिकारी.
गोवन वार्ता प्रतिनिधी
वास्को : येथील दामोदर सप्ताहासंबंधीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आमदार कृष्णा साळकर यानी घेतलेल्या बैठकीत भाविक, विक्रेते, नागरिकांची सुरक्षिता व सुव्यवस्था यासंबंधी चर्चा करण्यात आली. आमदार साळकर म्हणाले, संबंधित विभागांनी समन्वय ठेवावा. मागील सप्ताह काळात त्रुटी राहिल्या असतील, तर त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करावा. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात केले जाणार आहेत.
यंदा १८ ऑगस्ट रोजी दामोदर सप्ताह सुरू होणार आहे. पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आमदार साळकर यांनी गुरुवारी सकाळी मुरगाव पालिका सभागृहात बैठक बोलाविली होती. या बैठकीला पालिकेचे प्रशासक जयंत तारी, मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक, उपजिल्हाधिकारी प्रताप गावकर, पोलीस अधीक्षक गुरुदास कदम, निरीक्षक वैभव नाईक, मावळते नगराध्यक्ष गिरीश बोरकर, मावळते नगरसेवक दीपक नाईक, दामोदर सप्ताह समितीचे अध्यक्ष भरत कोलगावकर, सचिव सुरेश नाईक, खजिनदार प्रकाश गावस, दामोदर सप्ताह शिखर समितीचे अध्यक्ष व उद्योजक प्रशांत जोशी, तसेच आरोग्य, रस्ता, पाणी, वीज, अग्निशमन दल, वाहतूक तसेच इतर खात्यांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
आमदार साळकर म्हणाले, यंदाचा सप्ताह अधिक चांगला होण्यासाठी प्रयत्नशील राहावे. रस्ता दुरुस्तीची कामे ५च ऑगस्टपर्यंत पूर्ण करावीत. पथदीप दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत. गरजेनुसार पथदीप उभारावेत, वीजवुरवठा खंडित होऊ नये यासाठी खबरदारी घ्यावी. सप्ताह प्लास्टिक पिशव्या मुक्त करण्यात येणार आहे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर होणार नाही यासाठी पालिका, पोलीस यांनी खबरदारी घ्यावी. वास्कोतील पोलिसांची संख्या मंजूर संख्येपेक्षा कमी असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या निदर्शनाला आणून दिले आहे. अतिरिक्त पोलीस तैनात करण्याची विनंती केली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढविण्याची सूचना केली आहे. अन्न व औषध प्रशासनानेही योग्य ती तपासणी करावी. यंदा तीन ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे. त्यामुळे गैरसोय होणार नाही.
यंदाही भाविकांचा विमा : मुख्याधिकारी
मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक म्हणाले, गेल्या वर्षीच्या सप्ताहाकाळाचा अभ्यास करून त्रुटी दूर करण्यावर भर दिला आहे. अरुंद रस्त्यांवर गर्दी होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. यंदा एचपीसीएलच्या मोकळ्या जागेत, तानिया हॉटेलसमोरच्या मैदानावर व कदंब बसस्थानकावर पार्किंगची व्यवस्था केली आहे. यंदा प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई केली जाणार आहे. यंदाही भाविकांचा विमा काढला जाणार आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे, टेहळणी मनोऱ्यांची संख्या वाढवणार : पोलीस अधीक्षक
पोलीस अधीक्षक गुरुदास कदम म्हणाले, यंदा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व टेहळणी मनोऱ्यांची संख्या वाढविण्यासंबंधी आम्ही सूचना केली आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी आयआरबी पोलीस तैनात केले जातील. गर्दीच्या बाबतीतील मार्गदर्शक तत्त्वांचा वापर केला जाणार आहे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार आहे.


