कासावली येथील बंद असलेली सरकारी प्राथमिक विद्यालयाची इमारत.
फोंडा : धारबांदोडा तालुक्याची निर्मिती होऊन १५ वर्षे उलटली, तरी तालुक्यात अद्याप अग्निशामक दलाचे स्वतंत्र कार्यालय सुरू झालेले नाही. त्यामुळे आग, अपघात किंवा अन्य आपत्कालीन घटनांवेळी नागरिकांना फोंडा, कुडचडे किंवा वाळपई येथील अग्निशामक दलावर अवलंबून राहावे लागत असून मदत पोहोचण्यास होणाऱ्या विलंबामुळे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.
कासावली-मोले येथील बंद असलेल्या सरकारी प्राथमिक शाळेच्या इमारतीत अग्निशामक दलाचे कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव गेल्या वर्षभरापासून शासनदरबारी प्रलंबित आहे. या इमारतीची अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून ती कार्यालयासाठी योग्य असल्याचा अहवालही वरिष्ठांकडे सादर केला आहे. येथे दोन अग्निशामक वाहने आणि कर्मचाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था करण्याचाही प्रस्ताव आहे. मात्र, त्यानंतर कोणतीही पुढील कार्यवाही झालेली नाही.
मोले, साकोर्डा आणि कुळे पंचायत क्षेत्रात आग किंवा अपघात घडल्यास अग्निशामक दलाला फोंडा, कुडचडे किंवा वाळपई येथून यावे लागते. त्यामुळे घटनास्थळी पोहोचण्यास विलंब होऊन आगीमुळे मालमत्तेचे मोठे नुकसान होते. अनमोड घाटात वारंवार होणाऱ्या अपघातांमध्ये वाहनांमध्ये अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठीही विलंब होत असल्याने नागरिकांनी मोले येथे तातडीने अग्निशमन केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे.
कुळे येथील समाजसेवक व माजी पंच नंदिश देसाई यांनी सांगितले की, तालुक्यात इतर सर्व सरकारी कार्यालये सुरू असून, त्यांचा लाभ नागरिकांना मिळत आहे. मात्र, अग्निशामक दलाचे कार्यालय नसल्याने प्रत्येक आपत्कालीन प्रसंगी नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे सरकारने अन्य जागेचा शोध न घेता कासावली येथील बंद शाळेतच अग्निशामक दलाचे कार्यालय सुरू करण्याचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
बंद शाळेचा उपयोग करण्याची मागणी
कासावली येथील सरकारी प्राथमिक शाळा गेली ३-४ वर्षे बंद आहे. या इमारतीची दुरुस्ती करून तेथे अग्निशामक दलाचे कार्यालय सुरू केल्यास परिसरातील नागरिकांना त्वरित आपत्कालीन सेवा मिळण्याबरोबरच स्थानिकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील, असे मत व्यक्त होत आहे.


