दोनापावला ते मुरगाव ‘रो रो’ फेरी सुरू करावी : जीसीसीआयची मागणी

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
27 mins ago
दोनापावला ते मुरगाव ‘रो रो’ फेरी सुरू करावी : जीसीसीआयची मागणी

पणजी : गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या (जीसीसीआय)  शिष्टमंडळाने नुकतीच जीटीडीसीचे  अध्यक्ष आमदार केदार नाईक यांची भेट घेतली. यावेळी चेंबरतर्फे दोनापावला जेटीचा पुनर्विकास करण्याची मागणी केली. तसेच दोनापावला ते मुरगाव बंदर दरम्यान ‘रो रो’ फेरी सुरू करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली. शिष्टमंडळाने दोनापावला जेटीच्या आगामी पुनर्विकास आणि पायाभूत सुविधांच्या सुधारणेबाबत विविध शिफारसी सादर केल्या.

आमदार नाईक यांनी शिष्टमंडळाच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. जेटीचे काम वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगितले. शिष्टमंडळाने सांगितले की, दोनापावला जेटी आणि मुरगाव बंदर दरम्यान ‘रो-रो’ फेरी सेवा सुरू केल्यास पर्यटनाला मोठी चालना मिळेल. हा जलप्रवास उपलब्ध झाल्यास रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होईल. तसेच प्रवाशांच्या वेळेची बचत देखील होणार आहे.

ही जेटी २०२३ मध्ये पुन्हा सुरू होण्यापूर्वी तब्बल पाच वर्षे बंद होती.  नवीन कामादरम्यान स्थानिक विक्रेते, टॅक्सी चालक आणि आदरातिथ्य क्षेत्राला होणाऱ्या संभाव्य अडचणी लक्षात घेता हे काम त्वरित पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी जीटीडीसीने कंत्राटदारांना कठोर कालमर्यादा आखून द्यावी अशी विनंती चेंबरने केली.

याशिवाय शिष्टमंडळाने जेटीवर स्वच्छ पिण्याचे पाणी, सूसज्ज आणि स्वच्छ सार्वजनिक स्वच्छतागृहे, स्वतंत्र चालण्याचे मार्ग, योग्य प्रकाशयोजना आणि स्पष्ट माहिती फलक यासारख्या सार्वजनिक सुविधांमध्ये सुधारणा करण्याची विनंती केली.

ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींसाठी रॅम्पची सोय करणे, तसेच स्थानिक विक्रेत्यांसाठी सुटसुटीत आणि आकर्षक जागांची व्यवस्था करणे अशा मागण्या देखील करण्यात आल्या. आमदार नाईक यांनी गोव्याच्या पर्यटन, व्यापार क्षेत्रातील पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठीच्या भविष्यातील योजनांमध्ये जीसीसीआयचा सक्रिय विचार केला जाईल असे स्पष्ट केले.

हेही वाचा
सर्व पहा