संजील कुडचडकर यांच्या कथित अपहरणप्रकरणी संशयित पत्नीला अटक

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
21 mins ago
संजील कुडचडकर यांच्या कथित अपहरणप्रकरणी संशयित पत्नीला अटक

मडगाव : येथील संजील कुडचडकर यांच्या कथित अपहरण प्रकरणात मुख्य संशयित आणि त्यांची पत्नी मारिया लुईझा फर्नांडिस कुडचडकर हिला मडगाव पोलिसांनी अटक केली आहे. कारवार येथून तिला ताब्यात घेण्यात आले असून, या प्रकरणी यापूर्वी अन्य दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.

डॉ. सतीश कुडचडकर यांचे सुपुत्र संजील कुडचडकर यांचे भरदिवसा अपहरण झाल्याचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अपहरणात वापरलेली कार व संशयितांचा कर्नाटक येथील कारवारमध्ये शोध घेतला. हा कथित अपहरणाचा प्रकार मडगावमधील 'कोंब' येथे घडला असून, सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक महिला व आणखी दोघेजण संजील यांना जबरदस्तीने कारमध्ये कोंबून नेताना दिसत आहेत. संजील यांच्या मुलीच्या तक्रारीवरून मडगाव पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर पोलिसांनी संशयित सशीर बिन मसूद (रा. मायना-कुडतरी, मूळ हैदराबाद) व शाह अली सौदागर (रा. दवर्ली, मूळ सोलापूर) यांना अटक केली असून, त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या संपूर्ण प्रकरणामागे मुख्य संशयित म्हणून संजील यांची पत्नी मारिया लुईझा फर्नांडिस कुडचडकर हिचाच सहभाग असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. त्यानुसार मडगाव पोलिसांनी गोव्यातील पोलीस ठाण्यांसह महाराष्ट्र व कर्नाटकातील पोलिसांनाही सतर्क केले होते. तपासादरम्यान संशयित मारिया कारवार येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल असल्याची माहिती मिळाली. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मडगाव पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आणि गोव्यात आणून रितसर अटक केली. तिची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून, मारियाच्या कसून चौकशीनंतरच हा नेमका अपहरणाचा प्रकार होता की इतर काही कारण होते, याबाबतचे सत्य समोर येणार आहे.