भाजपची साथ मिळाल्यास डॉ. शेट्येंचा मार्ग निर्धोक

विधानसभेचा आखाडा : डिचोली


28th July, 11:43 pm
भाजपची साथ मिळाल्यास डॉ. शेट्येंचा मार्ग निर्धोक

प्रस्थापितांबरोबर नव्यांची जाेरदार तयारी
भाजपच्या उमेदवारीसाठी अनेक जण उत्सुक
माजी आमदार नरेश सावळ सक्रिय

गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : डिचोली मतदारसंघात भाजपची शक्ती मोठी आहे. याच शक्तीच्या जोरावर हा मतदारसंघ आपल्याकडे राखण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू असतात. यावेळी भाजपला आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांचे बळ प्राप्त झाले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर डॉ. शेट्येंनी निवडणूक लढविल्यास त्यांचा विजय सुकर होऊ शकतो. मात्र त्यांना आव्हान देण्यासाठी माजी आमदारांसह अनेक नवे चेहरे सक्रिय झाल्यामुळे रंगतदार लढतीची अपेक्षा आहे.


महेश म्हांबरे
डिचोलीतील मतदारांनी पक्षापेक्षा व्यक्तीवर प्रेम दाखविले आहे. मतदारसंघाचा इतिहास पाहिल्यास मतदारांनी पसंतीतील नेत्याला मानाचे स्थान दिले आहे. २०२२ च्या निवडणुकीत सभापती असूनही मतदारसंघात भाजपच्या अंतर्गत राजकारणात प्रभाव टाकण्यात कमी पडलेल्या राजेश पाटणेकर यांनी निवडणुकीपूर्वीच अंग बाजूला काढले होते. त्यामुळे ऐनवेळी डिचोली मतदारसंघात भाजपसमोर उमेदवाराबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. माजी आमदार नरेश सावळ व आताचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांना थेट उमेदवारीसाठी ऑफर्स देण्यात आल्या होत्या; मात्र ती ऑफर दोघांनीही नाकारली होती. परिणामी राजेश पाटणेकर यांनाच उमेदवारी घेण्यासाठी राजी करावे लागले. त्यावेळी महिला नेत्या शिल्पा नाईक, युवानेते कुंदन फळारी यांचीही नावे आघाडीवर होती; पण त्यांना बगल देत भापजने पुन्हा राजेश पाटणेकर यांनाच रिंगणात उतरण्यासाठी त्यांची मनधरणी केली व त्यांनाच उतरविले. अपेक्षेप्रमाणे राजेश पाटणेकर पराभूत झाले; पण डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या रूपात नवीन आमदार डिचोलीला लाभला. भाजपची ऑफर नाकारणे नरेश सावळ यांच्या अंगलट आले व त्यांचा पराभव झाला.


सनी मानकर
नवे चेहरे चर्चेत
मतदारसंघात चैतन्य उर्फ सनी मानकर यांनी सहा महिन्यांपासून सुरू केलेल्या सेवाभावी कामांमुळे राजकीय वर्तुळात लक्ष वेधले आहे. त्यांच्या वेगवान कार्यामुळे डिचोलीतील राजकारणाला मात्र गती मिळाली. काँग्रेस पक्षातर्फे महेश म्हांबरे यांचे काम सुरू आहे. आपल्या ‘बिचोलीम वेलफेअर फाऊंडेशन’च्या माध्यमातून व काँग्रेस पक्षाच्या बॅनरखाली महेश हे प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. गावकरवाडा डिचोली येथील सुनील उर्फ प्रसाद च्यारी यावेळी मतदारसंघातील स्नेहसंबंध व ओळखींचा लाभ घेत निवडणुकीत उतरण्याची तयारी केली आहे. त्यांनीही लोकांच्या गाठीभेटी व संपर्क यावर भर दिला आहे.


डॉ. चंद्रकांत शेट्ये

आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांचे जोरदार काम
डिचोली मतदारसंघात सध्या आमदार असलेल्या डॉ. चंद्रकांत शेट्ये यांचे काम जोरदार सुरू आहे. भाजप सरकारला त्यांनी दिलेली बिनशर्त साथ व त्यामुळे डिचोली मतदारसंघात चौफेर होत असलेली कामे. या राजकारणात भाजपकडूनही त्यांना मिळत असलेला पाठिंबा व सर्वतोपरी सहकार्य हे पाहता मतदारसंघात त्यांनी आपले नाव व काम सर्वत्र फैलावले आहे. या त्यांच्या प्रतिमेला सध्या माजी आमदार नरेश सावळ हे आपल्या अस्तित्वाच्या लढाईदाखल कडवे आव्हान देत आहेत. परंतु डॉ. शेट्ये यांचा गावोगावी असलेला संपर्क वरचढ ठरत आहे.
भाजपच्या उमेदवारीवरच ठरणार राजकारणाची दिशा
सध्या डिचोली मतदारसंघात भाजपच्या गटात आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांचा प्रभाव जास्तच दिसून येत असला तरी निवडणुकीत भाजपची उमेदवारी कोणाला मिळणार यावरच राजकारणाची दिशा ठरणार आहे. अपक्ष आमदार डॉ. शेट्ये यांच्या नावासह सध्या भाजपच्या उमेदवारीसाठी माजी नगराध्यक्ष कुंदन फळारी यांचेही नाव पुढे येत आहे. तसेच राजेश पाटणेकर यांचेही नाव अधूनमधून कानी पडत आहे. माजी आमदार नरेश सावळ यांचीही भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढविण्याची तयारी आहे.


नरेश सावळ
डॉ. शेट्ये, सावळ यांच्यासमोर अस्तित्व राखण्याचे आव्हान
या मतदारसंघात सध्याच्या परिस्थितीत नवीन उमेदवार उदयास आले असले तरी जास्त चर्चा आहे ती, विद्यमान आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये व माजी आमदार नरेश सावळ यांचीच. या दोन्ही नेत्यांसमोर आपले राजकीय अस्तित्व राखण्यासाठी धडपड सुरू आहे. दोन निवडणुका हरल्यानंतर तिसरी निवडणूक जिंकली तरच राजकारणात आपले अस्तित्व राहणार, अन्यथा आपणास या मतदारसंघातून गाशा गुंडाळावा लागणार याची जाणीव सावळ यांना आहे. एकेकाळी आमदार असताना नरेश सावळ यांचे बोट धरून जिल्हा पंचायत निवडणुकीत आपला भाऊ संजय शेट्ये यांना निवडून आणलेल्या विद्यमान आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्याही मार्गात अनेक अडथळे आहेत. त्यांच्यावर मात करून या निवडणुकीत विजयी होत आपले राजकीय अस्तित्व व सातत्य राखण्याचे आव्हान डॉ. शेट्ये यांच्यासमोर आहे. त्यांना यावेळी भाजपची योग्य साथ असल्याने त्यांची सकारात्मक दृष्टीने वाटचाल सुरूही आहे.


राजेश पाटणेकर
अंतर्गत कलह थोपविण्याचे भाजपसमोर आव्हान
डिचोलीत भाजपचे बळ मोठे आहे; पण या मतदारसंघात पक्षाला गेल्या पंधरा वर्षात अंतर्गत कलहाने ग्रासले आहे. याच अंतर्गत कलहामुळे गेल्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदाराला माघार घेण्यास भाग पाडले होते. त्यानंतर पक्षाचे राजकारण सुरळीतपणे सुरू असतानाच आमदार डॉ. शेट्ये यांचे बंधू संजय शेट्ये यांना पक्षात प्रवेश दिल्यानंतर ज्याप्रमाणे पक्षातील विविध विभागांवर आमदारांच्या गटाकडून वर्चस्व गाजविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचे परिणाम पक्षाच्या कार्यावर होत आहेत. पक्षाचे बळ शेट्ये यांच्यामुळे वाढले असले तरी सध्या ज्येष्ठता, सक्रियता यावरून सुरू झालेल्या संघर्षाचा परिणाम निवडणूक काळातील पक्ष कार्यावर दिसून येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सर्वांना एकत्र आणून पक्षातर्फे देण्यात येणाऱ्या उमेदवाराला काम करण्यासाठी तयार करण्याचे कसब भाजपला साध्य करावे लागणार आहे.

हेही वाचा
सर्व पहा