पणजी : भारतीय तटरक्षक दलाने (ICG) समुद्रात मानवतावादी मदत आणि तत्पर बचावकार्याचे आणखी एक उत्कृष्ट उदाहरण घालून दिले. गोव्याच्या किनाऱ्याजवळ पनामा ध्वजावरील एमटी हॉक्स लिबर्टी (MT Hawks Liberty) या व्यापारी जहाजावरील दोन गंभीर जखमी खलाशांची यशस्वी वैद्यकीय सुटका (Medical Evacuation) करून त्यांना सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणण्यात आले.
ही घटना आज शनिवारी घडली. जहाज मालदीव येथून प्रवास करत असताना त्यावरील जिमशेर डेविटाझे (३७, जॉर्जिया नागरिक) आणि अरुण बाबू वरुकाटू (३४, भारतीय नागरिक) यांची प्रकृती अत्यंत गंभीर बनली. दोघेही हालचाल करण्यास असमर्थ असल्याने तातडीच्या वैद्यकीय मदतीची आवश्यकता निर्माण झाली.
गोवा तटरक्षक दलाच्या प्रादेशिक मुख्यालयाने जहाज प्रशासन आणि संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून संपूर्ण बचाव मोहीम यशस्वीरीत्या राबवली. आयसीजीएस अक्षय (ICGS Akshay) या तटरक्षक जहाजावरील पथकाने अत्यंत कौशल्याने आणि वेगाने दोन्ही खलाशांना जहाजावरून सुरक्षितपणे बाहेर काढून किनाऱ्यावर आणले. त्यानंतर दोन्ही जखमींना तातडीने गोव्यातील मणिपाल रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.
भारतीय तटरक्षक दलाच्या या तातडीच्या कारवाईमुळे दोन्ही खलाशांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळणे शक्य झाले. भारतीय तटरक्षक दलाने समुद्री सुरक्षेबरोबरच आपत्कालीन परिस्थितीत मानवतावादी मदत व आंतरराष्ट्रीय सागरी बचावकार्यातील आपली बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.


