झेंडू उत्पादनात स्वयंपूर्ण होण्याचा संकल्प

मडगाव : राज्यातील झेंडू उत्पादनाला चालना देण्यासाठी आणि सणासुदीच्या काळात परराज्यांतून होणारी फुलांची आयात कमी करण्यासाठी गोवा कृषी विभागाने मोठा पुढाकार घेतला आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात राज्यभरातील शेतकऱ्यांना इस्रायली तंत्रज्ञानाने विकसित केलेली सुमारे तीन लाख दर्जेदार झेंडूची रोपे वितरित केली जाणार आहेत.
धारबांदोडा येथील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये पहिल्यांदाच अशा प्रगत रोपांची निर्मिती करण्यात आली आहे. भारत-इस्रायल कृषी प्रकल्पाअंतर्गत कृषी संचालनालयाने इस्रायलसोबत ही भागीदारी केली आहे. कृषी उपसंचालक दत्तात्रय पंडित यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोडार येथील स्वयंचलित ग्रीनहाऊसमध्ये इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर करून रोगमुक्त आणि उच्च दर्जाची रोपे तयार करण्यात आली आहेत. इस्रायली सल्लागार या केंद्राला वेळोवेळी भेट देऊन रोपे तयार करण्याचे तांत्रिक मार्गदर्शन करत आहेत.
दसऱ्याच्या मुहूर्तावर येईल पीक
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचे झेंडूचे पीक दसऱ्याच्या सुमारास फुलांवर येईल. या काळात गोव्यात झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. राज्यात वार्षिक झेंडूची मागणी सुमारे २,५०० टन एवढी असून, सध्या स्थानिक शेतकरी ३० हेक्टर क्षेत्रावर अवघे १८० टन उत्पादन घेतात. उर्वरित मागणी पूर्ण करण्यासाठी गोव्याला इतर राज्यांवर अवलंबून राहावे लागते. हेच परकीय अवलंबित्व कमी करणे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
प्रति रोप १ रुपयात उपलब्ध
शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी सरकारने या रोपांवर भरघोस सबसिडी दिली आहे. पूर्वी शेतकरी ५ रुपये प्रति रोप या दराने खरेदी करत होते, परंतु आता कृषी विभाग हे रोप केवळ ४ रुपयांत उपलब्ध करून देणार आहे. विशेष म्हणजे, सरकारी अनुदानामुळे ५०० चौरस मीटर क्षेत्रावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा प्रत्यक्ष खर्च प्रति रोप अवघा १ रुपया इतकाच येणार आहे. झेंडूच्या या यशस्वी प्रयोगानंतर कृषी विभाग आता भाजीपाला उत्पादनासाठी योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची तयारी करत आहे.