Home >> गोवा >> पावसाची दांडी, टँकरच्या पाण्यावर रंगला ‘चिखलकालो’

पावसाची दांडी, टँकरच्या पाण्यावर रंगला ‘चिखलकालो’

आबालवृद्ध गोविंदांनी लुटला आनंद : माशेल येथील श्री देवकीकृष्ण मंदिराच्या मैदानावर अपूर्व सोहळा

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
26th July, 11:55 pm
पावसाची दांडी, टँकरच्या पाण्यावर रंगला ‘चिखलकालो’

माशेल : आषाढी एकादशीच्या २४ तासांच्या सप्ताहाच्या समाप्ती प्रित्यर्थ आषाढी द्वादशीला माशेल येथील श्री देवकीकृष्ण मंदिराच्या मैदानावर पारंपरिक चिखलकाला-गोपाळकाला देऊळवाड्यावरील स्थानिकांकडून उत्साहात साजरा झाला. यंदा वरुणराजाने काहीशी गैरहजेरी लावली तरी टँकरद्वारे देवकीकृष्ण मैदानावर पाणी ओतून केलेल्या चिखलात मनसोक्त खेळणाऱ्या आबालवृद्ध गोविंदांनी संपूर्ण मैदान चैतन्यमय केले.

‘जय विठ्ठल, हरी विठ्ठल’च्या अखंड गजरात रंगलेला हा सोहळा भक्ती, परंपरा आणि लोकसंस्कृतीचा अविस्मरणीय उत्सव आहे. सुरुवातीला गोवेकर यांच्या दुकानात जाऊन त्यांनी दिलेले खोबरेल तेल अंगाला लावून, हरिनामाचा जयघोष करीत देवतांना नमन केल्यानंतर गोविंदांनी मैदानावर येऊन चिखलकाल्याला सुरुवात केली. अवघ्या क्षणांत मैदानावरील प्रत्येक गोविंद गोपाळ चिखलात एकरूप झाला.

चिखलात उड्या मारत नृत्य करणे, चेंडू फेक, चिखलातील मनोरंजक खेळ, नवरा-नवरीचा प्रतीकात्मक विवाह, दहीहंडी, एकमेकांना चिखल लावणे, चिखलात लोळणे अशा अनेक पारंपरिक खेळांनी वातावरण रंगून गेले. दोन गटांमध्ये बसून रंगणारे आरोप-प्रत्यारोपाचे विनोदी सादरीकरणही हजारोंच्या संख्येने उपस्थित नागरिक व भाविकांसाठी दरवर्षी विशेष आकर्षण ठरते. मैदानाच्या चारही बाजूंनी उभ्या असलेल्या हजारो प्रेक्षकांना हा अनोखा सोहळा मनसोक्त आनंदाचे भरते देऊन जातो.

दुपारी बारा वाजल्यापासून माशेल-देऊळवाडा येथील नागरिकांच्या सहभागाने चिखलकाल्याला प्रारंभ झाला. किमान तीन ते चार शतकांची परंपरा लाभलेल्या या उत्सवात लोकगीते, पारंपरिक खेळ, नृत्य आणि श्रीकृष्णाच्या बाललीलांचे अदभुत दर्शन घडते. आषाढी एकादशीच्या २४ तासांच्या देवकीकृष्ण मंदिरातील भजनी सप्ताहाची सांगता आषाढी द्वादशीला चिखलकाल्याने केली जाते. सप्ताह समाप्ती नंतर उपस्थित खेळाडू तेल लावून आल्यावर ‘गोपाळ गडी या रे’च्या जयघोषात सर्वजण मंदिराला प्रदक्षिणा घालतात आणि मैदानावर येतात. त्यानंतर चिखलकाल्याला सुरुवात होते.

सर्व खेळ झाल्यावर शेवटी पिंपळ झाडाला बांधलेली दहीहंडी फोडण्यात आली. त्यानंतर तेथील तलावात जाऊन आंघोळ केली. देवकीकृष्ण मंदिरात आल्यावर आरती, गार्हाणे व प्रसाद वाटल्यानंतर या चिखल काल्याची समाप्ती झाली.

प्रसाद मिळविण्यासाठी चढाओढ

गव्हाचे पिठ व नारळापासून तयार केलेला ‘बोल’ हा पारंपरिक खाद्यपदार्थ तसेच इतर प्रसाद नवस फेडण्यासाठी भाविकांमध्ये वाटण्यात आला. अनेकांनी नवस फेडत हा प्रसाद स्वतःच्या हाताने भाविकांना दिला. प्रसाद मिळविण्यासाठी लहान थोर नागरिकांची चढाओढ पाहायला मिळाली. 

हेही वाचा
सर्व पहा