
सांगे : शेळपे सांगे येथे कंत्राटदारामार्फत वीज खांब बदलण्याचे काम सुरू असताना उच्चदाब वीजवाहिनीला खांबाचा स्पर्श झाल्याने झालेल्या अपघातात झारखंड येथील मनोज सिंग या कामगाराचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तीन कामगार गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली.
शेळपे येथील जुने वीज खांब बदलण्याचे काम सुरू आहे. कामगार खांब बदलत असताना उच्चदाब वीज वाहिनीला खांबाचा स्पर्श होताच मनोज सिंग हा झारखंड येथील कामगार जागीच ठार झाला. त्याच्यासोबत काम करणारा मुडाय पंचवाडी येथील साईजीत नाईक, नागेश्वर कुमार व जुगल मेहता हे झारखंड येथील कामगार गंभीर जखमी झाले. त्यांना कुडचडे आरोग्य केंद्रात हलविण्यात आले आहे.
सांगेचे पोलीस निरीक्षक धितेंद्र नाईक यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. मनोज कुमार या कामगाराचा मृतदेह कुडचडे आरोग्य केंद्रातील शवागृहात पाठविण्यात आला.