Home >> गोवा >> कथ‌ित अपहरणप्रकरणातील कार कारवारमध्ये : पोलीस अधीक्षक

कथ‌ित अपहरणप्रकरणातील कार कारवारमध्ये : पोलीस अधीक्षक

तिघांना चौकशीसाठी मडगावात आणणार; कौटुंबिक वादातून प्रकार?

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
3 hours ago
कथ‌ित अपहरणप्रकरणातील कार कारवारमध्ये : पोलीस अधीक्षक

पणजी : मडगाव येथे एका डॉक्टच्या मुलाचे कारमध्ये कोंबून कथित अपहरण झाल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ माजली. मात्र, कौटुंब‌िक वादातून हे प्रकरण घडल्याचे पुढे आल्यानंतर त्याला नवे वळण मिळाले.  संबंधित कार तसेच त्यातील तिघांचा कारवारमध्ये शोध लागल्याची माहिती दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक टिकम सिंग यांनी दिली.

पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, संबंधित वाहन आणि त्यातील व्यक्तींना पुढील चौकशीसाठी मडगावात आणले जात आहे. प्राथमिक तपासात हे प्रकरण कौटुंबिक वादाशी संबंधित असल्याचे दिसून येत असले, तरी सर्व बाबींची सखोल चौकशी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन पुरुष आणि एका महिलेने एका तरुणाला जबरदस्तीने कारमध्ये बसवून घटनास्थळावरून निघून गेल्याचे दिसत होते. या घटनेनंतर अपहरणाची शक्यता व्यक्त करत नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली होती.

दरम्यान, पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत वाहनाचा माग काढला.  आणि ते कारवारमध्ये असल्याचे निष्पन्न झाले. संबंधित व्यक्तींना मडगावात आणल्यानंतर त्यांची जबानी नोंदवून कारमध्ये कोंबून नेण्याचे कारण व एकूण घटनाक्रम याची माहिती घेतली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक सिंग यांनी सांगितले. 

या प्रकरणाचा नेमका तपशील आणि कथित अपहरणामागील कारण चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी नागर‌िकांना केले आहे. 

हेही वाचा
सर्व पहा