
गुजरात: गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसाने दक्षिण गुजरातमध्ये हाहाकार माजवला असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. वलसाड, नवसारी, सुरत आणि अहमदाबादसह अनेक जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या भीषण पूरपरिस्थितीमुळे प्रशासनाची मोठी धावपळ उडाली आहे. वलसाड जिल्ह्यातील उंबरगाव तालुक्यात अवघ्या ३६ तासांत तब्बल १२०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. या अस्मानी संकटामुळे आतापर्यंत २२ हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून, विविध ठिकाणी अडकलेल्या १,२०० हून अधिक लोकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, वलसाड आणि नवसारी या जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्यापाठोपाठ सुरत, तापी, डांग, अहमदाबाद आणि खेडा जिल्ह्यांतही मुसळधार पावसामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. वलसाड जिल्ह्यातील औरंगा, पार आणि दमणगंगा या प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे नदीकाठच्या अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. वापी शहरातील इमारतींच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या ५० हून अधिक गाड्या पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचे थरारक व्हिडिओ समोर आले आहेत.
लष्कर आणि 'एनडीआरएफ' मैदानात
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मदत व बचावकार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) आणि लष्कराच्या अनेक तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
वाहतूक आणि वीज पुरवठा खंडित
अतिवृष्टीमुळे चार राष्ट्रीय महामार्ग आणि तीन राज्य महामार्गांसह १,२०० हून अधिक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. यामुळे अनेक भागांत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. तसेच, मुंबईकडे जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या असून काहींचे मार्ग टप्प्यातच समाप्त करण्यात आले आहेत. दक्षिण गुजरातमध्ये ३५ हून अधिक वीज सब-स्टेशन्सचे कामकाज ठप्प झाल्यामुळे अनेक भाग अंधारात गेले आहेत.
हवामान विभागाचा 'रेड अलर्ट'
हवामान विभागाने भरुच, सुरत, नवसारी, वलसाड, डांग आणि नर्मदा या जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा 'रेड अलर्ट' जारी केला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मदत आयुक्त गौरंग मकवाना यांनी बाधित जिल्ह्यांमधील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला आहे.