Home >> देश -परदेश >> कोल्हापूर : संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टमध्ये ६१ कोटींचा घोटाळा

कोल्हापूर : संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टमध्ये ६१ कोटींचा घोटाळा

तत्कालीन धर्मादाय निरीक्षक, कंत्राटदारावर गुन्हा : जमीन खरेदी, आर्थिक व्यवहार चौकशीच्या फेऱ्यात

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
43 mins ago
कोल्हापूर : संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टमध्ये ६१ कोटींचा घोटाळा

कोल्हापूर : महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरातमधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर (ता. भुदरगड)  येथील श्री संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टमध्ये तब्बल ६१ कोटी रुपयांचा कथित आर्थिक घोटाळा समोर आला आहे. या प्रकरणी तत्कालीन धर्मादाय निरीक्षक रागिणी खडके, संत बाळूमामा देवस्थान सचिव रावसाहेब बिराप्पा कोणकेरी  आणि संबंधित कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संपूर्ण प्रकरणाचा पोलीस आणि धर्मादाय विभागाकडून सखोल तपास सुरू आहे.

६० कोटी ७५ लाख २८ हजार रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आले आहे. प्राथमिक चौकशीनुसार, देवस्थानच्या निधीतून ५५ लाख रुपयांचा धनादेश आवश्यक कायदेशीर मंजुरीशिवाय संबंधित कंत्राटदाराला देण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच ट्रस्टसाठी करण्यात आलेल्या दोन जमिनींच्या खरेदी व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार आणि अपहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मेंढी विक्री व्यवहारातही गैरव्यवहार झाल्याचे दिसून आले आहे. 

या प्रकरणातील गंभीर अनियमितता लक्षात घेऊन तत्कालीन धर्मादाय निरीक्षक रागिणी खडके यांना यापूर्वीच निलंबित करण्यात आले आहे. चौकशीनंतर त्यांच्यासह संबंधित कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत धर्मादाय आयुक्तालयातील निरीक्षक राजेंद्र रंगराव गडकरी (रा. बदलापूर, ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकाराने भाविकांच्या श्रद्धेला तडा गेल्याची प्रतिक्रिया आहे. 

भाविकांमध्ये तीव्र नाराजी 

संत बाळूमामा यांच्या नावाने भाविकांनी अर्पण केलेल्या देणग्या आणि देवस्थानच्या निधीचा कथित गैरवापर झाल्याच्या आरोपामुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, जमीन व्यवहारांमधून नेमका कोणाला लाभ झाला आणि निधीचा वापर नियमबाह्य पद्धतीने का करण्यात आला, याचा पोलीस कसून तपास करत आहेत. प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता, तपासातून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

हेही वाचा
सर्व पहा