Home >> देश -परदेश >> पुणे हादरले; महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर सामूहिक अत्याचार

पुणे हादरले; महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर सामूहिक अत्याचार

चौघांना अटक

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
5 hours ago
पुणे हादरले; महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर सामूहिक अत्याचार

पुणे : पुण्यातील वाघोली परिसरात एका २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल वर्षभर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर वाघोली पोलिसांनी चार संशयितांना अटक केली  आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी २०२५ मध्ये पुण्यातील एका महाविद्यालयात उच्च शिक्षणासाठी दाखल झाली होती. शिक्षणादरम्यान तिची ओळख फरान शेख या तरुणाशी झाली. या ओळखीचा गैरफायदा घेत संशयिताने तरुणीवर लैंगिक अत्याचार करून त्याचे अश्लील व्हिडिओ तयार केल्याचा आरोप आहे.

यानंतर फरान शेख आणि त्याचे साथीदार फजल शेख, रेहान शेख व साहिल यांनी हे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्याची तसेच कुटुंबीयांना दाखवण्याची धमकी देत पीडितेला सतत ब्लॅकमेल केले. या धमक्यांच्या आधारे चारही संशयितांनी गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर वारंवार सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

सततच्या मानसिक छळामुळे आणि धमक्यांमुळे पीडित तरुणी दीर्घकाळ गप्प राहिली. मात्र, संशयितांचा वाढता त्रास असह्य झाल्यानंतर तिने धैर्याने वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील (BNS) संबंधित कलमांन्वये सामूहिक बलात्कार, गुन्हेगारी धमकी व इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला. त्यानंतर तातडीने कारवाई करत फरान शेख, फजल शेख, रेहान शेख आणि साहिल या चौघांना अटक करण्यात आली आहे.

या घटनेमुळे पुणे शहरासह शैक्षणिक वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे.  पोलिसांकडून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

हेही वाचा
सर्व पहा