सोन्याच्या दरात मोठी घसरण

आणखी मोठी घसरण होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
21st July, 09:53 am
सोन्याच्या दरात मोठी घसरण

न्यूयॉर्क : अमेरिका–इराणमधील वाढत्या तणावामुळे जागतिक आर्थिक बाजारपेठेत अस्थिरता वाढली आहे. त्याचा परिणाम सोन्याच्या किमतींवरही झाला आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोन्याच्या दरात घसरण होत आहे. या आठवड्यात सोन्याला गेल्या सहा आठवड्यांतील सर्वात मोठ्या साप्ताहिक घसरणीचा सामना करावा लागत आहे. तज्ज्ञांच्या मते यापुढेही सोन्याच्या दरात घसरण होणार आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होत १९८० प्रमाणे उच्चांकापासून सोन्याच्या दरात ५० टक्के घसरण होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. 

शुक्रवारी स्पॉट गोल्डचा दर प्रति औंस ३,९७०.३५ डॉलर इतका स्थिर राहिला. मात्र, आठवडाभरात सोन्याच्या किमतींमध्ये ३ टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. ऑगस्ट डिलिव्हरीसाठीच्या अमेरिकन गोल्ड फ्युचर्समध्येही ०.५ टक्क्यांची घसरण होऊन दर ३,९७३.१० डॉलर प्रति औंस इतका नोंदवला गेला.

तज्ज्ञांच्या मते, अमेरिका–इराण तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे महागाई वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.  अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढविण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे. व्याजदर वाढल्यास रोख्यांवरील (बाँड्स) परतावा आकर्षक ठरतो आणि त्यामुळे व्याज न देणाऱ्या सोन्यातील गुंतवणूक तुलनेने कमी होते. याचबरोबर, अमेरिकन डॉलर सलग दुसऱ्या दिवशी मजबूत झाल्याने इतर देशांतील गुंतवणूकदारांसाठी सोने अधिक महाग झाले आहे. त्यामुळेही सोन्यावरील दबाव कायम राहिला आहे.

बाजार विश्लेषकांच्या मते, सध्या मजबूत डॉलर, वाढती महागाई आणि संभाव्य व्याजदरवाढ हीच सोन्याच्या किमतीतील घसरणीची प्रमुख कारणे ठरत असून, भू-राजकीय तणाव कायम राहिल्यास बाजारातील अस्थिरता पुढील काही दिवसही सुरू राहण्याची शक्यता आहे.


हेही वाचा
सर्व पहा