Home >> देश -परदेश >> श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिरातील दानमोजणी प्रक्रियेत मोठे बदल

श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिरातील दानमोजणी प्रक्रियेत मोठे बदल

पारदर्शकतेसाठी दुकानदारांनाही जबाबदारी

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
20th July, 05:45 pm
श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिरातील दानमोजणी प्रक्रियेत मोठे बदल

मथुरा : अयोध्येतील श्री राम मंदिरातील कथित दानचोरी प्रकरणानंतर मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर प्रशासनाने दानमोजणी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यासाठी महत्त्वाचे बदल लागू केले आहेत. रविवारपासून नवीन व्यवस्था अमलात आली असून, दानमोजणीवर अधिक कडक देखरेख ठेवण्यात येणार आहे.

नवीन व्यवस्थेनुसार, मंदिर परिसरातील सुमारे ३० दुकानदारांनाही दानमोजणी प्रक्रियेवर देखरेख करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. दानमोजणीच्या वेळी एक किंवा दोन दुकानदार उपस्थित राहतील. या ड्युटीचे नियोजन दुकानदार परस्पर सहमतीने करतील, अशी माहिती मंदिर व्यवस्थापन समितीने दिली आहे.

याशिवाय, दानमोजणी कक्षातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढविण्यात आली आहे.  दान मोजणाऱ्या कर्मचाऱ्यांना मानक कार्यपद्धतीचे (SOP) काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक राहावी आणि कोणत्याही प्रकारच्या गैरव्यवहाराला वाव मिळू नये, यासाठी सुरक्षारक्षकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिरात दरमहा सुमारे एक कोटी रुपयांचे दान जमा होत असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी दिनेश फलाहारी महाराज यांनी मंदिरातील दानाच्या हिशेबात कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र लिहून सीबीआय चौकशीची मागणी केली होती.

त्यांनी दानमोजणीदरम्यान जाणूनबुजून सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले जातात आणि भक्तांनी दिलेल्या देणगीत गैरव्यवहार होतो, असा गंभीर आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने दानमोजणी प्रक्रियेत व्यापक बदल करत पारदर्शकता वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा
सर्व पहा