पतंजलीचे संशोधन आंतरराष्ट्रीय ‘रिसर्च जर्नल’मध्ये प्रकाशित

हरिद्वार : भारतीय आयुर्वेद परंपरेतील अत्यंत लोकप्रिय आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे रसायन असलेल्या ‘च्यवनप्राश’च्या गुणकारी असण्यावर आता आधुनिक विज्ञानानेही शिक्कामोर्तब केले आहे. महर्षी च्यवन यांच्या कथेचा संदर्भ असलेल्या च्यवनप्राशवर पतंजलीच्या शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन ‘एक्स्पेरिमेंटल जेरॉन्टोलॉजी’ या नामांकित आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेत (रिसर्च जर्नल) प्रकाशित झाले आहे. पतंजलीच्या या संशोधनाने आयुर्वेदाला जागतिक स्तरावर साक्ष-आधारित वैद्यकीय प्रणाली म्हणून स्थापित करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकले आहे.
या यशाबद्दल माहिती देताना पतंजलीचे आचार्य बाळकृष्ण म्हणाले की, प्राचीन काळात महर्षी च्यवन जेव्हा अत्यंत वृद्ध आणि जर्जर अवस्थेत होते, तेव्हा त्यांच्यासाठी एक विशेष ‘रसायन’ तयार करण्यात आले होते. या रसायनाच्या नियमित सेवनाने महर्षी च्यवन यांना पुन्हा ऊर्जा, स्फूर्ती, उत्तम आरोग्य आणि यौवन प्राप्त झाले; म्हणूनच या औषधाला ‘च्यवनप्राश’ हे नाव मिळाले. ही केवळ एक पौराणिक कथा नसून कोट्यवधी भारतीयांच्या आरोग्याचा तो मुख्य आधार आहे. आता पतंजलीच्या शास्त्रज्ञांनी याच प्राचीन कथेला आधुनिक विज्ञानाच्या पुराव्यांसह जगासमोर आणून जिवंत केले आहे.
अत्याधुनिक प्रयोगशाळेतील निष्कर्ष
पतंजलीचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. अनुराग वार्ष्णेय यांनी या संशोधनाविषयी सविस्तर माहिती दिली. या अभ्यासासाठी शास्त्रज्ञांनी ‘सी. एलिगन्स’ या मॉडेल जीवाचा वापर केला. या जिवाची जैविक प्रक्रिया बऱ्याच अंशी मानवाशी साधर्म्य दर्शवणारी असते आणि जगभरात वृद्धत्व तसेच तणावविषयक संशोधनासाठी हा जीव एक प्रामाणिक मॉडेल म्हणून स्वीकारला जातो.
जागतिक विज्ञानाला भारताचा संदेश
पतंजलीचा हा शोधनिबंध ‘सायन्स डायरेक्ट’ आणि ‘पबमेड’ सारख्या जागतिक दर्जाच्या वैज्ञानिक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करण्यात आला आहे. हजारो वर्षांपूर्वीचे भारतीय ज्ञान आजच्या आधुनिक काळातही तितकेच प्रासंगिक, प्रभावी आणि भविष्यवेधी आहे, असाच संदेश या संशोधनातून जागतिक वैज्ञानिक समुदायाला मिळाला आहे. भविष्यातील आरोग्यविषयक आव्हानांचा सामना करण्यासाठी भारताचा आयुर्वेद सज्ज असल्याचा विश्वास या निमित्ताने व्यक्त होत आहे.