खून, अपहरण, अमली पदार्थ तस्करीसह गंभीर गुन्ह्यांचे आरोप

वॉशिंग्टन : पंजाबमधील कुख्यात जग्गू भगवानपुरिया संघटित गुन्हेगारी टोळीचा कथित साथीदार आणि भारतीय वंशाचा गँगस्टर नितीश कौशल याला अमेरिकेतील फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (FBI) अटक केली आहे. (Indian-origin gangster Nitish Kaushal, an alleged associate of the Punjab-based Jaggu Bhagwanpuria organised crime group, has been arrested in the US ) एफबीआयच्या 'मोस्ट वाँटेड' यादीत नाव समाविष्ट झाल्यानंतर काही दिवसांतच व्हरमाँट येथे अमेरिकन कायदा अंमलबजावणी यंत्रणांनी त्याला ताब्यात घेतले.
अमेरिकेच्या न्याय विभागाने अलीकडेच 'ऑपरेशन हार्ड बॉल' अंतर्गत मोठी कारवाई करत भारताशी संबंधित लॉरेन्स बिश्नोई, जग्गू भगवानपुरिया आणि धंदा या संघटीत गुन्हेगारी टोळ्यांविरोधात मोहीम उघडली होती. या कारवाईत १५ जणांना अटक करण्यात आली असून, एकूण ३४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी नितीश कौशल हा फरार आरोपींपैकी एक होता.
एफबीआयने दिलेल्या माहितीनुसार, २५ जून २०२६ रोजी कॅलिफोर्नियाच्या सेंट्रल डिस्ट्रिक्ट न्यायालयाने कौशलविरोधात रिको (RICO (Racketeer Influenced and Corrupt Organizations Act) अंतर्गत कट रचल्याचा गुन्हा दाखल करून ‘अटक वॉरंट’ जारी केले होते.
गंभीर गुन्हयांचा समावेश
तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, कौशलवर खून, अपहरण, अमली पदार्थांची तस्करी, खंडणी, शस्त्रास्त्रांची तस्करी, मनी लॉन्डरिंग आणि मानवी तस्करी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागाचा आरोप आहे. तसेच भगवानपुरिया टोळीच्या वतीने त्याने अपहरण आणि हल्ल्यांसारख्या हिंसक कारवाया केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
एफबीआयने त्याला "सशस्त्र आणि अत्यंत धोकादायक" असल्याचे म्हटले होते. तो फरार होण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांना त्याच्याबाबत माहिती देण्याचे आवाहनही करण्यात आले होते.
जग्गू भगवानपुरिया टोळीचा जागतिक विस्तार
अमेरिकेच्या न्याय विभागाच्या माहितीनुसार, पंजाबमधील जग्गू भगवानपुरिया याने या गुन्हेगारी टोळीची स्थापना केली. सध्या तो भारतातील तुरुंगात असून, एकेकाळी लॉरेन्स बिश्नोईचा साथीदार असलेला भगवानपुरिया नंतर त्याचा प्रतिस्पर्धी बनला.
तपासानुसार, भगवानपुरिया टोळीचे जाळे आता जगभरात १,००० हून अधिक सदस्य आणि सहकाऱ्यांपर्यंत विस्तारले आहे. अमेरिकेतच या टोळीचे १०० हून अधिक सदस्य असल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय कॅनडा, ब्रिटन, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथेही या टोळीचे नेटवर्क कार्यरत असल्याचे अमेरिकन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
अमेरिकन तपास यंत्रणांनी असा आरोपही केला आहे की, भारतातील काही भ्रष्ट कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांच्या मदतीने या टोळीने खंडणीसारखे गुन्हे केल्याचे तपासात समोर आले आहे. कौशल दोषी ठरल्यास त्याला किमान १० वर्षांपासून ते जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेला सामोरे जावे लागू शकते.