Home >> ताज्या बातम्या >> ‘कामधेनू’ योजनेंतर्गत खरेदी करता येणार २० गायी : मुख्यमंत्री

‘कामधेनू’ योजनेंतर्गत खरेदी करता येणार २० गायी : मुख्यमंत्री

१० गायींसाठी ९० टक्के, उर्वरित १० गायींसाठी ७५ टक्के सबसिडी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
29 mins ago
‘कामधेनू’ योजनेंतर्गत खरेदी करता येणार २० गायी : मुख्यमंत्री

फोंडा : गोव्यातील दूध उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने ‘कामधेनू’ योजनेत महत्त्वाचा बदल करत आता एका लाभार्थ्याला २० गायी खरेदी करता येणार आहे. या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील १० गायींसाठी ९० टक्के, तर पुढील १० गायींसाठी ७५ टक्के अनुदान दिले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.गोवा डेअरीच्या दूध उत्पादकांना दरफरक तसेच वाढीव दर वितरण कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर, सहकार मंत्री सुभाष शिरोडकर, सहकार निबंधक आशुतोष आपटे, नगरसेवक रितेश नाईक, गोवा डेअरीचे अध्यक्ष पराग नगर्सेकर, पशुसंवर्धन खात्याचे संचालक डॉ. नितीन नाईक व राजीव गांधी कला मंदिराचे अध्यक्ष रितेश नाईक उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक मदत व सहकार्य गोवा सरकार करत आहे. दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना २४ तास काम करावे लागते. दिवसेंदिवस राज्यात दुधाची गरज वाढत आहे. दूध, भाजी, फळे, मासे यात गोवा स्वयंपूर्ण व्हावा, असे सरकारचे प्रयत्न आहेत.
एप्रिल ते जुलैपर्यंत ४ हजार कोटींचे कर्ज घेणे शक्य असतानाही गोवा सरकारने एकाही पैशाचे कर्ज घेतलेले नाही. उलट पूर्वीच्या सरकारानी घेतलेल्या कर्जाचे ६०० कोटी रुपये फेडलेले आहेत. उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाचा हा परिणाम आहे, असे ते म्हणाले.
सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सरकारच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन केले. दूध उत्पादकांच्या खात्यात दरफरकाची रक्कम दर महिन्याच्या १० तारखेला जमा करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पशुसंवर्धन मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी पशुसंवर्धन क्षेत्रासाठी अनेक नवीन योजना सुरू करण्यात आल्याचे सांगत, पारंपरिक व्यवसायांना चालना देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे नमूद केले.यावेळी गोवा डेअरीच्या दूध उत्पादकांना दरफरक तसेच वाढीव दर वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले आहे. पशुसंवर्धन खात्याचे संचालक डॉ. नितीन नाईक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. नितीन कोलवेकर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. रामा परब यांनी आभार मानले.
भेसळयुक्त दुधावर होणार कडक कारवाई
गोव्यात इतर राज्यांतून येणाऱ्या दुधावर अवलंबून राहावे लागत आहे. भेसळयुक्त दूध लोकांच्या आरोग्यासाठी घातक आहे. दूध आणि दुधापासून तयार करण्यात येणाऱ्या इतर मिठाईवर कडक नजर ठेवण्याचा आदेश अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिलेला आहे. दूध उत्पादकांना उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
रुग्णवाहिका पोचणार थेट गोठ्यात
दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना २४ तास कार्यरत रहावे लागते. गुरांना २४ तास वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. रात्री १ वाजता शेतकऱ्यांने फोन केला तर पशू वैद्यकीय रूग्णवाहिका थेट गोठ्यात पोचविण्याची व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व डबल इंजिन सरकारमुळेच शेतकऱ्यांना अधिकाधिक सवलती व अनुदान देणे सरकारला शक्य होत आहे. यापूर्वीच्या सरकारानी फक्त कर्जे घेतली. पण, लोकांना काही मदत केली नाही. माझ्या सरकारने गेल्या चार महिन्यांत एकाही पैशाचे कर्ज न घेता विविध योजना व प्रकल्प सुरूच ठेवले आहेत.
डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री