हरमनप्रीत सिंगऐवजी हरमनप्रीत कौरचा उल्लेख; 'एससीईआरटी'कडून चूक मान्य

पणजी : गोवा राज्य संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) नवीन शैक्षणिक धोरणानुसार (एनईपी) तयार केलेल्या इयत्ता आठवीच्या कोकणी भाषेच्या पाठ्यपुस्तकातील ‘विंडसर्फर कात्या कुएलो’ यांच्यावरील धड्यात एक गंभीर चूक झाल्याचे समोर आले आहे.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनावेळी हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग उपस्थित असताना, पाठ्यपुस्तकात त्याऐवजी महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर यांचा उल्लेख करण्यात आला आहे. ही चूक लक्षात आल्यानंतर ती दुरुस्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालक मेघना शेटगावकर यांनी दिली.
गोवा सरकारने राज्यातील कर्तृत्ववान व्यक्तींची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष धोरण आखले आहे. याच धोरणाचा भाग म्हणून आठवीच्या कोकणी पाठ्यपुस्तकात गोव्याची राष्ट्रीय विंडसर्फर चॅम्पियन कात्या कुएलो हिच्यावर आधारित एका पाठाचा समावेश करण्यात आला आहे.
या धड्यात २०२३ मध्ये गोव्यात झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाचा उल्लेख आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पर्धेची मशाल कात्या कुएलो यांच्याकडे सुपूर्द केली होती. त्या वेळी त्यांच्या सोबत हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग उपस्थित होता. मात्र, पाठ्यपुस्तकात चुकून हरमनप्रीत कौर यांचे नाव छापले गेले.
नावातील साम्यामुळे घोळ
या त्रुटीबद्दल स्पष्टीकरण देताना एससीईआरटीच्या संचालिका शेटगावकर म्हणाल्या, दोन्ही खेळाडूंचे पहिले नाव ‘हरमनप्रीत’ असल्याने संपादन आणि मुद्रण प्रक्रियेदरम्यान हा गोंधळ झाला. पुस्तक तयार करताना ही चूक कोणाच्याही लक्षात आली नाही, मात्र ती आता आमच्या निदर्शनास आली आहे. आम्ही ही चूक मान्य केली असून, ती दुरुस्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.