Home >> गोवा >> नागरिक वार्ता : नगरगाव येथील पुलाचा जोडरस्ता अपूर्ण

नागरिक वार्ता : नगरगाव येथील पुलाचा जोडरस्ता अपूर्ण

नागरिक संतप्त : तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
31 mins ago
नागरिक वार्ता : नगरगाव येथील पुलाचा जोडरस्ता अपूर्ण

वाळपई : सत्तरी तालुक्यातील नगरगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील श्री हनुमान मंदिरासमोरील नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचा जोडरस्ता अद्याप अपूर्ण अवस्थेत असल्याने स्थानिक नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. पुलाचे मुख्य बांधकाम पूर्ण झाले असले, तरी दोन्ही बाजूंना आवश्यक असलेला जोडरस्ता न झाल्यामुळे नागरिकांची ये-जा धोकादायक बनली आहे. संबंधित कंत्राटदाराकडून सातत्याने हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने हस्तक्षेप करून उर्वरित काम पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी होत आहे.
श्री हनुमान मंदिरासमोरील हा पूल अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. स्थानिक नागरिकांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अखेर या पुलाच्या बांधकामाला मंजुरी मिळाली आणि काही महिन्यांपूर्वी पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. मात्र पुलाच्या दोन्ही बाजूंना आवश्यक असलेला जोडरस्ता अद्यापही पूर्ण करण्यात आलेला नाही. जोडरस्त्याच्या ठिकाणी केवळ दगड टाकून तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. हे दगड योग्य प्रकारे बसविण्यात आलेले नसल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी तसेच दुचाकीस्वारांना या मार्गावरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक वेळा दुचाकी घसरून किरकोळ अपघात झाल्याच्या घटनाही घडल्या असून भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
सध्या पावसाळा सुरू असल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. संपर्क रस्त्यावर टाकलेल्या दगडांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने रस्त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे वाहनचालकांना कोणत्या ठिकाणी खड्डा आहे किंवा रस्ता कुठे संपतो, याचा अंदाज लागत नसल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. रात्रीच्या वेळी तर ही परिस्थिती अधिकच धोकादायक बनत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा
सर्व पहा