कुंकळ्ळी शौर्य प्रतिष्ठानतर्फे आयोजित ८ वा जलाभिषेक सोहळा उत्साहात

पणजी : इ.स. १५८३ च्या ऐतिहासिक कुंकळ्ळी उठावातील १६ महानायकांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी कुंकळ्ळी शौर्य प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ८ वा जलाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न झाला. (The 8th Jal Abhishek, organised by Kunkalli Shourya Prathishthan, was held at the Chieftains Memorial to honour the 16 Chieftains of the historic 1583 Cuncolim Uprising.). महानायक स्मारक, कुंकळ्ळी येथे संपन्न झालेला हा कार्यक्रम वीरश्री वाढवणारा ठरला.
इतिहासप्रेमी, १७ महानायकांचे वंशज, विविध देवस्थानांचे महाजन, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण आरती मंडळ, कुळवाडा यांच्या पारंपरिक आरती सादरीकरणाने झाली. त्यानंतर कुंकळ्ळी युनायटेड हायर सेकंडरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या समूहगीताने उपस्थितांमध्ये इतिहासाविषयी अभिमानाची भावना जागवली.
श्री चंद्रेश्वर भूतनाथ कला मंच यांनी सादर केलेल्या कुंकळ्ळी उठावावरील ऐतिहासिक पथनाट्याने उपस्थितांना इतिहासाची जिवंत अनुभूती दिली. प्रदीन चितारी व सहकाऱ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने वातावरण अधिक भारावून गेले.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेला जलाभिषेक सोहळा अत्यंत पारंपरिक पद्धतीने पार पडला. श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण मंदिरातील पवित्र जलकलश हा १२ गावकरांनी तर कुंकळ्ळी व परिसरातील विविध देवस्थानांचे महाजन आपल्या देवस्थानातील पवित्र जल घेऊन महानायक स्मारकावर आणले. त्यानंतर सर्वांच्या उपस्थितीत स्मारकावर पवित्र जलाभिषेक करून हुतात्म्यांना कृतज्ञ अभिवादन करण्यात आले.
यावेळी धर्मरक्षक पुरस्कार रवींद्र रमेश रेडकर (गोवा विभाग गोरक्षा प्रमुख, बजरंग दल) यांना धर्मरक्षण व गोरक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रदान करण्यात आला. धर्मप्रसारक पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक, इतिहास अभ्यासक व समाजसेवक श्रीपाद गोविंद देसाई यांना इतिहास, साहित्य, शिक्षण व धर्मजागृती क्षेत्रातील त्यांच्या दीर्घकालीन योगदानाबद्दल प्रदान करण्यात आला.
गेली सात वर्षे जलाभिषेक सोहळ्याचे सातत्याने आयोजन करून १५८३ च्या कुंकळ्ळी उठावाची जनजागृती करण्यासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल श्री शांतादुर्गा सेवा समिती यांचा विशेष गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिदीप देसाई यांनी केले. त्यांनी जलाभिषेकाची संकल्पना, गेल्या आठ वर्षांचा प्रवास आणि या उपक्रमामागील ऐतिहासिक उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन संपद देसाई यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाच्या प्रचार-प्रसाराची जबाबदारी रोहन देसाई यांनी सांभाळली.
या कार्यक्रमाला श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकारीण संस्थानचे अध्यक्ष विनोद देसाई, श्री शांतादुर्गा वेरोडेकरीण देवस्थानचे अध्यक्ष शुभम देसाई, कुंकळ्ळी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विदेश देसाई, स्वातंत्र्यसैनिकांचे सुपुत्र विशाल देसाई, शैलेश वैद्य, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक सौ. सुशीला पाडियार, माजी आयएएस अधिकारी एल्विस गोम्स, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत धर्मजागरण प्रमुख रागेश कुंटे, अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाचे अध्यक्ष सुहास फळदेसाई यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कुंकळ्ळी शौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश देसाई यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणारे सर्व देवस्थानांचे महाजन, १७ महानायकांचे वंशज, कलाकार, स्वयंसेवक, देणगीदार, प्रसारमाध्यमे आणि उपस्थित नागरिक यांचे मनःपूर्वक आभार मानले. हा जलाभिषेक केवळ स्मरणाचा सोहळा नसून, गोव्याचा अस्सल इतिहास आणि शौर्यपरंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचे एक प्रभावी लोकआंदोलन असल्याचे त्यांनी सांगितले.