पीपल्स एज्युकेशनल ट्रस्टचा ९० वा वर्धापन दिन संपन्न; काकुलो परिवारातर्फे ५० लाखांची देणगी

पणजी: विद्यार्थ्यांनी आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला न घाबरता सामोरे जावे. जे काही समोर येईल त्याचा स्वीकार करून, आहे त्या परिस्थितीत सर्वोत्तम बनण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन 'फोमेंतो रिसॉर्ट्स'च्या व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अंजू तिंबलो यांनी केले. बुधवारी पीपल्स एज्युकेशनल ट्रस्टचे संस्थापक मंगेश सुर्लकर यांच्या ११८ व्या जयंतीनिमित्त तसेच संस्थेच्या ९० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून त्या बोलत होत्या.
या प्रसंगी संस्थेचे विश्वस्त राहुल देशपांडे, शिल्पा देशपांडे, उद्योजक मनोज काकुलो, पांडुरंग काकुलो यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वतःची स्पर्धा स्वतःशीच करा
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तिंबलो म्हणाल्या, "सध्याच्या युगात प्रचंड स्पर्धा आहे. मात्र, दुसऱ्या कोणाला अधिक गुण मिळाले म्हणून मनाला लावून घेऊ नये. विद्यार्थ्यांनी स्वतःची स्पर्धा स्वतःशीच करावी. आपण काय आहोत, हे ओळखून प्रत्येकाने आपले ध्येय निश्चित करावे. कोणाशीही तुलना न करता आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा विचार करावा. तुम्ही निवडलेल्या मार्गावर तुम्हाला मदत करणारी योग्य माणसे नक्कीच मिळतील. गेल्या काही वर्षांत शिक्षण क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान आणि सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. आपल्याला भविष्यात काय करायचे आहे आणि आपल्यासाठी काय योग्य आहे, याचा सखोल विचार करूनच विद्यार्थ्यांनी उपलब्ध पर्यायांबाबत योग्य निर्णय घ्यावा."
दिल्लीहून गोव्यात आल्याचा आपला अनुभव सांगताना त्या म्हणाल्या की, गोव्यातील आदरातिथ्याची संस्कृती अत्यंत सुसंस्कृत आहे. एक महिला असूनही इथे मला कधीच कोणी नाउमेद केले नाही; उलट प्रत्येक वेळी गोमंतकीय जनतेने मला प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांनी आपण अशा पाठीशी उभे राहणाऱ्या राज्यात आहोत, याची जाणीव ठेवून प्रगती करावी.
काकुलो परिवाराकडून ५० लाखांची देणगी
तत्पूर्वी, पीपल्स एज्युकेशनल ट्रस्टला ५० लाख रुपयांची भरीव देणगी दिल्याबद्दल काकुलो परिवाराचे विशेष आभार मानण्यात आले. या वेळी उद्योजक पांडुरंग काकुलो, मनोज काकुलो आणि सूरज काकुलो यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी बोलताना मनोज काकुलो यांनी विद्यार्थ्यांना आपले शालेय आणि महाविद्यालयीन जीवन आनंदाने जगण्याचा सल्ला दिला. संस्थेला भविष्यातही सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, लवकरच विद्यार्थ्यांच्या वर्गांमध्ये वातानुकूलित यंत्रणा (एसी) बसवण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विश्वस्त राहुल देशपांडे यांनी मंगेश सुर्लकर यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आढावा घेतला. या सोहळ्यात संस्थेच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विशेष यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.