सुमारे तीन कोटी रुपये खर्च; मंत्री दिगंबर कामत यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ

मडगाव: मडगावमधील ऐतिहासिक कोमुनिदाद इमारतीच्या दुरुस्ती व नूतनीकरणाच्या कामाला सुमारे ३ कोटी रुपये खर्चून सुरुवात करण्यात आली आहे. इमारतीतील ऐतिहासिक व महत्त्वाची कागदपत्रे पुढील तीन ते चार महिन्यांसाठी सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्याचे निर्देश देण्यात आले असून, दुरुस्तीचे हे काम आगामी डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी दिली.
सार्वजनिक बांधकाम विभागाने दक्षिण विभाग कोमुनिदाद प्रशासकीय इमारतीच्या तातडीच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या कामाचा रीतसर शुभारंभ मंत्री दिगंबर कामत यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी उपजिल्हाधिकारी गणेश बर्वे, कोमुनिदाद समितीचे पदाधिकारी तसेच बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कागदपत्रांच्या जतनासाठी त्रिसदस्यीय समिती
या वेळी बोलताना मंत्री कामत म्हणाले की, ही जुनी प्रशासकीय इमारत मडगाव शहराच्या मध्यवर्ती भागात असून तो एक ऐतिहासिक वारसा आहे. दक्षिण गोव्यातील सर्व कोमुनिदाद एकत्र येऊन या इमारतीची निर्मिती करण्यात आली होती. त्यामुळे ही वास्तू सुरक्षित करणे अत्यंत गरजेचे होते. यापूर्वी कोमुनिदाद समितीने सहकार्य केले असते, तर ही जुनी इमारत पाडून त्या जागी बहुमजली इमारत उभारली असती आणि तिचा ताबा कोमुनिदाद प्रशासनाकडेच दिला असता. मात्र, आता समितीने नूतनीकरणासाठी सहमती दर्शवली असून सुमारे ३ कोटी रुपये खर्चून हे काम केले जात आहे.
सध्या इमारतीमधील जुने साहित्य आणि अत्यंत महत्त्वाच्या कागदपत्रांमुळे प्रत्यक्ष कामात अडचण येत आहे. येथील ऐतिहासिक कागदपत्रांची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. त्यामुळे या कागदपत्रांची व्यवस्थित नोंद व तपासणी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्याचे निर्देश उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या समितीच्या देखरेखीखाली मोडके फर्निचर निकाली काढले जाईल आणि महत्त्वाची कागदपत्रे पुढील काही महिन्यांसाठी सुरक्षितस्थळी हलवली जातील.
जागा वाटपाबाबत कोमुनिदाद प्रशासन निर्णय घेणार
या इमारतीमध्ये पूर्वी जी व्यावसायिक किंवा इतर आस्थापने होती, त्यांना नूतनीकरणानंतर पुन्हा जागा मिळणार का, असे विचारले असता मंत्री कामत यांनी स्पष्ट केले की, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मडगावचा आमदार या नात्याने सरकारी मालमत्ता व इमारती चांगल्या स्थितीत ठेवणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यानुसार या वास्तूची दुरुस्ती आणि नूतनीकरण करणे एवढेच आमचे काम आहे. कुणाला जागा उपलब्ध करून द्यायची की नाही, यामध्ये आपला कोणताही हस्तक्षेप असणार नाही; याबाबत कोमुनिदाद प्रशासक, पदाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी योग्य तो निर्णय घेतील.
३०० दिवसांत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
पर्वरी येथील 'मेसर्स सुपरकॉन्स इंजिनिअर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीला २.९६ कोटी रुपयांमध्ये या नूतनीकरणाचे कंत्राट देण्यात आले आहे. दक्षिण गोव्यातील काणकोण, चिंचणी, लोटली, मडगाव, बाणावली आणि नागोवा कोमुनिदादच्या प्रतिनिधींनी या इमारतीची दुरुस्ती करण्याची मागणी लावून धरली होती. या नूतनीकरण प्रक्रियेत इमारतीची पाणी निचरा व्यवस्था सुधारण्यासोबतच जुन्या ऐतिहासिक नोंदींचे जतन करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. निविदेतील अटींनुसार या कामाची मुदत १३ मार्च २०२७ (३०० दिवस) पर्यंत असली, तरी हे काम डिसेंबर २०२६ पर्यंतच पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे.