‘रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान’चे पत्र व्हायरल

बलुचिस्तान : पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांताने स्वतंत्र राष्ट्राची घोषणा केली आहे. यासंदर्भात ‘रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान’ या नावाचे एक पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (A viral claim that Balochistan has declared independence from Pakistan has sparked intense debate across social media). त्याची जगभरात चर्चा सुरू झाली आहे. मात्र, या दाव्याला अद्याप कोणत्याही अधिकृत संस्थेचा किंवा आंतरराष्ट्रीय समुदायाचा दुजोरा मिळालेला नाही.
व्हायरल पत्रानुसार, नव्याने स्थापन झालेल्या ‘रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान’ प्रशासनाने बलुचिस्तानच्या सुमारे ८५ टक्के भूभागावर नियंत्रण मिळवल्याचा दावा केला आहे. तसेच स्वतंत्र सरकार, राष्ट्रीय ध्वज, राष्ट्रगीत आणि चलन स्वीकारल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
या कथित घोषणेनुसार ‘मा चुकैन बलोचानी’ हे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारण्यात आले असून ‘बलोची फालूस’ नावाचे स्वतंत्र चलन सुरू केल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय सोने-तांबे खाणी, नैसर्गिक वायू क्षेत्रे आणि कोळसा खाणींवरही नियंत्रण असल्याचे पत्रात म्हटले आहे.
पत्रात पाकिस्तानच्या लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांतील काही अधिकारी व जवानांनी राजीनामे देऊन बलुच चळवळीत सहभाग घेतल्याचाही दावा करण्यात आला आहे. २०२६ अखेरपर्यंत पाकिस्तानच्या सैन्याला हटविण्याची तयारी सुरू असल्याचेही त्यात नमूद करण्यात आले आहे.
मात्र, या सर्व दाव्यांना कोणताही स्वतंत्र किंवा अधिकृत पुरावा उपलब्ध नाही. पाकिस्तान सरकार, संयुक्त राष्ट्रसंघ (यूएन) किंवा अन्य कोणत्याही मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय संस्थेने बलुचिस्तान स्वतंत्र झाल्याची घोषणा किंवा ‘रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान’ला मान्यता दिलेली नाही.
दरम्यान, या व्हायरल पत्रामुळे बलुचिस्तानमधील दीर्घकालीन स्वातंत्र्यवादी चळवळीची चर्चा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. सोशल मीडियावर या विषयावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत. सध्याच्या घडीला बलुचिस्तान स्वतंत्र राष्ट्र झाल्याचा दावा अधिकृतरीत्या सिद्ध झालेला नसल्याने त्याकडे सावधगिरीने पाहण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.