अनेक रस्ते बंद

श्रीनगर/डेहराडून : उत्तर भारतात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मोठा कहर माजवला असून (Havoc caused by torrential rains in the north) जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या ढगफुटीमुळे अचानक आलेल्या पुराने मोठे नुकसान झाले आहे. पहलगामच्या नल्ला अवूरा (Nalla Awoora) परिसरात आलेल्या पुरामुळे चिखल, दगड आणि ढिगाऱ्यांनी परिसर व्यापला आहे. अनेक ठिकाणी मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
ढगफुटीनंतर निर्माण झालेल्या वेगवान पाण्याच्या प्रवाहामुळे परिसरातील रस्ते आणि अन्य पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर चिखल व दगडांचा साठा झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाने तातडीने बचाव आणि मदतकार्य सुरू केले आहे. आपत्कालीन पथके सतर्क ठेवण्यात आली आहेत.
उत्तराखंडमध्ये अनेक ठिकाणी भूस्खलन, रस्ते बंद
दरम्यान, उत्तराखंडमध्येही मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे. डोंगर उतारांवरून मोठ्या प्रमाणात दगड व माती कोसळल्याने अनेक प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. काही भागांचा संपर्क तात्पुरता तुटला असून अत्यंत आवश्यक असेल तेव्हाच प्रवास करण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे.
मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागाने उत्तर भारतातील अनेक भागांत पुढील काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.