अनेकांच्या स्वप्नांचा चुराडा; मृतांचा अधिकृत आकडा ४,११८ वर

कराकस : व्हेनेझुएलामध्ये विनाशकारी दुहेरी भूकंप होऊन १८ दिवस होऊन गेले तरी आजही परिस्थिती एकदम गंभीर आहे. कोसळलेल्या इमारती, घरांच्या ढिगाऱ्यात आजही येथील नागरिक आपल्या जवळच्यांचा शोध घेत आहेत. (Venezuela continues quake recovery as official death toll reaches 4,118; over 1,100 aftershocks) एकूण हे केविलवाणे चित्र चटका लावणारे आहे. मृतांचा अधिकृत आकडा ४,११८ वर पोहोचला आहे. बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध अद्याप सुरू आहे.
भूकंपाच्या या विनाशकारी आपत्तीने इमारतींच्या ढिगाऱ्यात अनेकांची स्वप्ने कायमची गाढली आहेत. आपल्या जवळच्यांचा शोध घेताना नागरिकांना हुंदका आवरणे कठीण होत आहे. अधिकृत माहितीनुसार, या आपत्तीत १६,७४० जण जखमी झाले आहेत. ६,४६२ नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली. भूकंपानंतर आतापर्यंत १,१७१ आफ्टरशॉक्स (पश्चात धक्के) नोंदवण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, ८६ हजारांहून अधिक कुटुंबांना मदत पोहोचवण्यात आली आहे. तसेच १७ हजारांहून अधिक विस्थापित नागरिक अजूनही देशभर उभारलेल्या तात्पुरत्या निवारा छावण्यांमध्ये राहत आहेत.
बचाव आणि मदतकार्यासाठी ३०,०७६ सुरक्षा व बचाव कर्मचारी, २९,८४३ स्वयंसेवक आणि ३,४५४ आंतरराष्ट्रीय बचाव पथकातील सदस्य तैनात करण्यात आले आहेत.
दरम्यान, कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष डेल्सी रोड्रीग्झ (Delcy Rodríguez ) यांनी मदतीचा हात पुढे करणाऱ्या २८ देशांचे आभार मानले. कराकसमधील मदत संकलन केंद्राला भेट देताना त्यांनी सांगितले की, दोन हजार टनांहून अधिक आंतरराष्ट्रीय मदत सामग्रीची छाननी करून ती तात्पुरत्या निवारा छावण्यांमध्ये वितरित केली जात आहे.
या भीषण आपत्तीतील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सरकारने यापूर्वी सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला होता. तसेच प्रभावित भागांचे पुनर्वसन आणि पुनर्बांधणी हे सरकारचे पुढील प्रमुख उद्दिष्ट असल्याचेही राष्ट्राध्यक्षांनी स्पष्ट केले.