Home >> देश -परदेश >> होर्मुझ संकटातून धडा; मंगळुरूमध्ये नवा सामरिक तेलसाठा उभारणार

होर्मुझ संकटातून धडा; मंगळुरूमध्ये नवा सामरिक तेलसाठा उभारणार

केंद्र सरकार, ओएनजीसी देणार ऊर्जा सुरक्षेला बळकटी; १७.५ लाख मेट्रिक टन क्षमतेचा प्रकल्प

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
होर्मुझ संकटातून धडा; मंगळुरूमध्ये नवा सामरिक तेलसाठा उभारणार

नवी दिल्ली : अमेर‌िका- इराण-इस्त्राईल यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनीत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने ऊर्जा सुरक्षेला अधिक बळकटी देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. देशातील अग्रगण्य तेल व नैसर्गिक वायू कंपनी (ONGC ) मंगळुरूमध्ये १७.५ लाख मेट्रिक टन क्षमतेचा नवा सामरिक कच्चे तेल साठा (Strategic Petroleum Reserve - SPR)  उभारणार असल्याची माहिती कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या निवेदनात दिली.

इस्रायल-अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षानंतर काही काळ होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतुकीवर परिणाम झाला होता. जगातील सुमारे २० टक्के ऊर्जा पुरवठा या समुद्री मार्गातून होत असल्याने भारतासह अनेक देशांना त्याचा फटका बसला. याच अनुभवातून भविष्यातील कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारत सामरिक तेलसाठा वाढवत आहे.

ओएनजीसीने या नव्या साठ्याचा राष्ट्रीय हितासाठी व्यावसायिक वापर करण्यास केंद्र सरकारची परवानगी मागणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. सध्या भारतात मंगळुरू, पाडूर आणि विशाखापट्टणम येथे एकूण ५.३३ दशलक्ष मेट्रिक टन क्षमतेचे सामरिक तेलसाठे असून त्यांचे व्यवस्थापन इंडियन स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह्स लिमिटेड (ISPRL) करत आहे.

मंगळुरूमधील ३ लाख बॅरल प्रतिदिन क्षमतेची रिफायनरी ओएनजीसीची उपकंपनी मंगळुरू रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (MRPL) चालवते. विद्यमान १५ लाख मेट्रिक टन क्षमतेच्या साठ्यापैकी निम्मी जागा एमआरपीएलने भाडेतत्त्वावर घेतली असून उर्वरित क्षमता संयुक्त अरब अमिरातीच्या अॅडनॉक (ADNOC)  कंपनीकडे आहे.

 चांदीखोल, पाडूर नवीन तेलसाठे उभारणार  

दरम्यान, भारत ऊर्जा सुरक्षेसाठी संयुक्त अरब अमिराती आणि जपान यांसारख्या देशांशी सहकार्य अधिक मजबूत करत आहे. तसेच ओडिशातील चांदीखोल येथे ४ दशलक्ष मेट्रिक टन आणि पाडूर येथे आणखी २.५ दशलक्ष मेट्रिक टन क्षमतेचे नवीन सामरिक तेलसाठे उभारण्याचाही केंद्र सरकारचा मानस आहे.

हेही वाचा
सर्व पहा