पुणे : भारताची खरी ताकद कशात आहे, असा प्रश्न विचारल्यावर कोणी अर्थव्यवस्था, सैन्य किंवा लोकसंख्येचा उल्लेख करेल. परंतु, देशातील ७० कोटी महिला हीच भारताची खरी संपत्ती आणि सर्वात मोठी ताकद आहे, असे प्रतिपादन काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले. पुण्यामध्ये आयोजित ‘छात्रों की गुंज’ या विशेष संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी देशभरातील युवक-युवतींशी संवाद साधत महिलांचे स्थान आणि स्वातंत्र्यावर महत्त्वपूर्ण विचार मांडले.
उपस्थितांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले, मी येथे राजकारणावर बोलण्यासाठी आलेलो नाही. महिला या पुरुषांच्या तुलनेत स्वभावतः अधिक संवेदनशील, सौम्य, दयाळू आणि दूरदृष्टी असलेल्या असतात. समाजात महिलांना प्रामुख्याने मुलगी, पत्नी किंवा आई या तीन भूमिकांमध्येच पाहिले जाते. या नात्यांनी ओळखले जाण्यात काही गैर नाही; परंतु हीच त्यांची एकमेव ओळख असू शकत नाही. महिलांचे स्वतःचे एक स्वतंत्र अस्तित्व आणि ओळख आहे.
पारंपरिक चौकटींवर टीका करताना ते पुढे म्हणाले, मनुस्मृतीने महिलांना केवळ विशिष्ट चौकटीत बसवले आणि त्यांना स्वातंत्र्यापासून दूर ठेवले. परंतु आजच्या आधुनिक भारताच्या विकासात महिलांची भूमिका अत्यंत निर्णायक आहे.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पुण्यात पार पडलेल्या या ‘छात्रों की गुंज’ संवाद मेळाव्यासाठी राज्यभरातून महाविद्यालयीन युवक-युवतींनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रमुख नेते पुण्यात उपस्थित होते. या मेळाव्यात राहुल गांधी यांनी तरुणाईशी थेट संवाद साधत शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक बदलांवर सविस्तर चर्चा केली.


