झांबोये येथे सोन्याची खाण कोसळली; १०० हून अधिक जणांचा मृत्यू

मध्य आफ्रिकन प्रजासत्ताकच्या (CAR) पश्चिम भागातील झांबोये गावाजवळील एका सोन्याच्या खाणीत भूस्खलन होऊन भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक अधिकारी आणि मदतकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे. खाणीत आणखी अनेक जण अडकले असण्याची शक्यता असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
10 hours ago
झांबोये येथे सोन्याची खाण कोसळली; १०० हून अधिक जणांचा मृत्यू

बांगुई : मध्य आफ्रिकन प्रजासत्ताकच्या (CAR) पश्चिम भागातील झांबोये गावाजवळील एका सोन्याच्या खाणीत भूस्खलन होऊन भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक अधिकारी आणि मदतकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे. खाणीत आणखी अनेक जण अडकले असण्याची शक्यता असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ही दुर्घटना झांबोये गावात घडली. हे गाव बाबुआ शहरापासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर असून कॅमेरूनच्या सीमेजवळ आहे. सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या व्हिडीओमध्ये मोठ्या प्रमाणात वाळू आणि मातीचा ढिगारा खाण परिसरातील लोकांवर कोसळताना दिसत आहे.

स्थानिक सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेनंतर अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. रेड क्रॉसच्या मदतकार्याशी संबंधित स्वयंसेवक गेरवाइस गानागोरोह यांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, १०० हून अधिक मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. स्थानिक खाण संघटनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानेही या आकड्याला दुजोरा दिला आहे.

दरम्यान, बाबुआ येथील दुसऱ्या एका सरकारी वकिलांनी खाणीत सुरू असलेल्या अनेक भूमिगत बोगद्यांचा भाग कोसळल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली आहे.

खाणीत काम करणाऱ्या सेड्रिक म्बांगो यांनी या दुर्घटनेचे वर्णन ‘अत्यंत भीषण’ असे केले. बचाव पथकांकडून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचे तसेच मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. या खाणीत मध्य आफ्रिकन प्रजासत्ताकचे आणि कॅमेरूनचे नागरिक काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. कॅमेरूनच्या पूर्व भागातील अधिकाऱ्यांनी त्यांच्या देशातील किमान तीन नागरिकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे.

झांबोये युवक परिषदेचे सदस्य बर्ट्राँ बे यांगे यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांपैकी कोणी जिवंत सापडल्यास ते चमत्कारच ठरेल, असे त्यांनी म्हटले. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी खाणीत काम करणाऱ्या तरुणांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने गावावर दुःखाचे सावट पसरले आहे.

बचावकार्यादरम्यान अवजड यंत्रसामग्रीचा वापर करण्यात येत आहे. मात्र, ढिगाऱ्याखाली कोणी जिवंत असल्यास यंत्रसामग्रीच्या वापरामुळे त्यांच्या बचावाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. दुर्घटनेच्या वेळी खाणीत नेमके किती कामगार होते, याची अद्याप निश्चित माहिती मिळालेली नाही.

मध्य आफ्रिकन रिपब्लिकमध्ये बेरोजगारी आणि गरिबीमुळे लघुस्तरीय अनधिकृत खाणींमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक काम करतात. या खाणींमध्ये सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव असल्याने वारंवार दुर्घटना घडतात. यावर्षीच मध्य आफ्रिकन प्रजासत्ताकमध्ये विविध खाण दुर्घटनांमध्ये किमान ४० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

हेही वाचा
सर्व पहा