गोवन वार्ता। प्रतिनिधी
पणजी : गोवा विद्यापीठातील स्कूल ऑफ फिजिकल अॅण्ड अप्लायड सायन्स विभागात इलेक्ट्रॉनिक्स विषयाचे वरिष्ठ प्राध्यापक प्रा. राजेंद्र गाड यांची विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचा आदेश राज्यपाल तथा कुलपती पुसापती अशोक गजपती राजू यांनी जारी केला. माजी कुलगुरू प्रा. हरिलाल मेनन यांचा कार्यकाळ संपल्यानंतर नव्या कुलगुरूंची नियुक्ती करण्यात आली. मंगळवार, २५ ऑगस्ट रोजी ते कुलगुरूपदाचा ताबा स्वीकारणार आहेत.
गोवा विद्यापीठात अनेक वर्षे अध्यापन करणाऱ्या प्रा. राजेंद्र गाड यांना २०१९-२० या वर्षाचा सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांनी विविध आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. विविध संस्था आणि संस्थांच्या १५ हून अधिक प्रकल्पांसाठी ते मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. इलेक्ट्रॉनिक्स विषयात ‘मल्टीव्हेरिएंट सिग्नल्स अँड सिस्टिम्स’ तसेच ‘कॉम्प्युटर नेटवर्क’ हे त्यांच्या विशेष अभ्यासाचे विषय आहेत.
कुलगुरूपदासाठी गोवा विद्यापीठातील प्राध्यापक तसेच अन्य मान्यवरांचे सुमारे २०० अर्ज आले होते. कुलगुरू निवडीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने शिफारस केल्यानंतर प्रा. राजेंद्र गाड यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली. ५३ वर्षीय प्रा. गाड हे कामुर्ली (बार्देश) गावचे सुपुत्र आहेत.
गोवा विद्यापीठ हे राज्यातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र आहे. गोवा विद्यापीठ तसेच राज्यातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासह विद्यापीठाची प्रतिष्ठा राखण्याचा कुलगुरू म्हणून मी प्रयत्न करणार आहे.
_ प्रा. राजेंद्र गाड, नूतन कुलगुरू, गोवा विद्यापीठ


