पणजी : माजी मंत्री तसेच साळगाव मतदारसंघाचे माजी आमदार जयेश साळगावकर यांनी भाजप प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने गोव्याच्या राजकीय वर्तुळात नव्या समीकरणांना उधाण आले आहे. पक्षाचा राजीनामा देण्यापूर्वी साळगावकर यांनी गोव्याचे मुख्यमंत्री तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांची भेट घेऊन त्यांचे औपचारिक आशीर्वाद घेतले. राजीनामा सुपूर्द केल्यानंतर, आगामी राजकीय वाटचाल आणि आपली पुढील भूमिका स्पष्ट करण्यासाठी ते सायंकाळी चारच्या सुमारास पत्रकार परिषद घेणार आहेत.
दुसरीकडे, साळगावचे विद्यमान आमदार केदार नाईक यांनी या घडामोडींवर भाष्य केले. भाजप ही एक मजबूत संघटनात्मक ताकद असलेला पक्ष असून प्रत्येक निवडणुकीसाठी पक्षाची विशिष्ट रणनीती असते, असे नाईक म्हणाले. निवडणुकीच्या तोंडावर पक्षाचा त्याग करून नवीन राजकीय विचारधारा स्वीकारणे साळगावकर यांच्यासाठी आव्हानात्मक ठरेल, असा दावा त्यांनी केला. साळगाव मतदारसंघात भाजपचे संघटन भक्कम असून साळगावकरांच्या बाहेर पडण्याचा अंतिम फायदा भाजपलाच मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राजकीय मतभेद आणि रणनीती वेगळी असली, तरी वैयक्तिक मैत्री कायम असल्याचे सांगत नाईक यांनी साळगावकर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या घडामोडींमुळे साळगावातील राजकीय वातावरण आगामी काळात अधिक रंगतदार ठरणार आहे.
जयेश साळगावकर यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस विधीमंडळ नेते युरी आलेमाव यांनी स्पष्ट आणि तटस्थ भूमिका मांडली. एखाद्या राजकीय पक्षाचा राजीनामा देऊन निवडणूक लढविण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. साळगावकर यांनी काँग्रेस अध्यक्षांची भेट घेतली आहे किंवा नाही, याबाबत मला कोणतीही माहिती नाही. त्यामुळे त्यांच्या संभाव्य काँग्रेस प्रवेशाबाबत सध्या मी काहीच बोलू शकत नाही, असे आलेमाव यांनी नमूद केले.


