विजय सरदेसाईंची नवी भूमिका: युतीची चर्चा स्थगित अन् 'म्हजो गाव थंय हांव' अभियानाची घोषणा

गोवा फॉरवर्ड पक्षाने युतीबाबतची चर्चा स्थगित करत 'म्हजो गाव थंय हांव' अभियान घोषित केले. काँग्रेसच्या संभाव्य फुटीवर विजय सरदेसाईंनी टीका केली, तर आरजीपी व काँग्रेसने आपापली रणनीती स्पष्ट केली. आगामी तीन दिवशीय पावसाळी अधिवेशनाचे कामकाज निश्चित करण्यासाठी आज २१ ऑगस्ट रोजी कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. तत्पूर्वी आणि बैठकीनंतर देखील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. वाचा सविस्तर

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
10 hours ago
विजय सरदेसाईंची नवी भूमिका: युतीची चर्चा स्थगित अन् 'म्हजो गाव थंय हांव' अभियानाची घोषणा

पणजी : आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर गोव्याच्या राजकारणात वेगाने घडामोडी घडत असून, गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी राजकीय युतीबाबत सुरू असलेली सर्व प्रकारची चर्चा तुर्तास स्थगित करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. पक्षाच्या मूळ राजकीय भूमिकेत कोणताही बदल झालेला नसून, पक्ष आपल्या विचारांवर पूर्णपणे ठाम आहे. युतीबाबतचा अंतिम निर्णय पक्षाची उच्चस्तरीय मध्यवर्ती समिती कार्यकर्ते आणि नेत्यांच्या भावनांचा विचार करून लवकरच घेईल, असे सरदेसाई यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

याचसोबत पक्षाने राज्यात व्यापक जनसंपर्क प्रस्थापित करण्यासाठी 'म्हजो गाव थंय हांव' या विशेष मोहिमेची घोषणा केली आहे. २२ ऑगस्ट २०२६ पासून कुशावती जिल्ह्यातील सावर्डे भागातून या अभियानाचा औपचारिक शुभारंभ होणार आहे. या मोहिमेद्वारे पक्षाचे नेते व कार्यकर्ते गावोगावी जाऊन स्थानिक नागरिकांचे प्रश्न समजून घेणार असून, गोव्याच्या प्रादेशिक अस्मितेवर आधारित मुद्द्यांवर जनमत तयार करण्याचा प्रयत्न करणार आहेत. 

गोवा विधानसभेच्या ३१ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या तीन दिवशीय पावसाळी अधिवेशनाचे कामकाज निश्चित करण्यासाठी २१ ऑगस्ट रोजी कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. यावेळी विरोधी पक्षांतील नेत्यांनी बतजकीला हजेरी लावली होती. 

विरोधकांनी सरकारचे गैरप्रकार आणि भ्रष्टाचार उघडकीस आणून जनतेचे प्रश्न मांडणे हेच एका कार्यक्षम लोकशाहीचे मूळ लक्षण असल्याचे प्रतिपादन करण्यात आले आहे. गोवा विधानसभेच्या कार्यसल्लागार समितीच्या (BAC) बैठकीत राज्याच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर सभागृहात पुरेशी चर्चा करण्याची ठाम मागणी करण्यात आली. विरोधकांच्या या मागणीची दखल घेत शुक्रवारी 'प्रायव्हेट मेंबर्स डे' सह इतर महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा घेण्याचे मान्य करण्यात आले आहे, अशीही माहिती विजय यांनी पत्रकरांशी बोलताना दिली. 

दुसरीकडे, परिवहन विभागातील अनागोंदी कारभारावर निशाणा साधत विविध टेंडर, डिजिटल मीटर, ट्रॅकर आणि HSRP नंबर प्लेट्सच्या नावाखाली लोकांकडून पैसे उकळण्याचे नवनवीन मार्ग शोधले जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. तसेच, स्थानिक गोमंतकीय टॅक्सी चालकांना 'माफिया' किंवा 'गुंड' म्हणून हिणवणे थांबवून, त्यांच्या रास्त समस्या प्रशासनाने प्राधान्याने सोडवाव्यात अशी आग्रही मागणीही यावेळी करण्यात आली.

काँग्रेसवर घणाघात: पक्षान्तराच्या 'हॅट्रिक'चा दावा आणि स्थिर पर्यायाची गरज

दरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना विजय सरदेसाई यांनी विरोधी पक्षांतील प्रमुख घटक असलेल्या काँग्रेसवर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली होती. २०१९ मध्ये काँग्रेसचे १० आमदार आणि २०२२ मध्ये ८ आमदार सत्ताधारी पक्षात गेले होते. या पार्श्वभूमीवर, आगामी काळात काँग्रेसमध्ये पुन्हा फूट पडून पक्षान्तराची 'हॅट्रिक' पूर्ण होईल अशी दाट भीती आम जनतेच्या मनात निर्माण झाली आहे, असा दावा त्यांनी केला.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अलिकडच्या गोवा दौऱ्यानंतरही पक्षातील ऐक्याविषयी जनतेच्या मनात शंका कायम आहे. सत्ताधारी भाजपवर केवळ वैचारिक किंवा भावनिक टीका करून चालणार नाही, तर विरोधकांनी एकत्र येऊन एक भक्कम आणि स्थिर 'पर्यायी धोरणात्मक चौकट' (Alternate Policy Framework) जनतेसमोर मांडली पाहिजे. जर विरोधक स्पष्ट पर्याय देऊ शकले नाहीत, तर जनतेचा विश्वास संपादन करणे अशक्य होईल, असा सल्लाही त्यांनी दिला.

आरजीपीची स्पष्टोक्ती: अंतर्गत बंडाळीचा इन्कार, संघटनात्मक पुनर्रचनेवर भर

दुसरीकडे, रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षात (आरजीपी) अंतर्गत बंडाळी असल्याच्या चर्चांवर पक्षाचे नेते वीरेश बोरकर यांनी स्पष्टीकरण दिले. पक्षात कसलेही अंतर्गत राजकारण नसून पक्ष पूर्णपणे एकसंध आहे. सध्या पक्षाची संघटनात्मक पुनर्रचना आणि विविध मतदारसंघांमधील ब्लॉक कमिट्यांची बांधणी वेगाने सुरू असल्याचे बोरकर यांनी स्पष्ट केले.

शिवोली मतदारसंघासह राज्यभरात पक्षाच्या बैठकांचे सत्र सुरू असून, ज्या मतदारसंघांत पक्षाची ताकद मजबूत आहे तिथे विशेष भर दिला जात आहे. राजकीय युती, जागावाटपाचे सूत्र आणि कॉमन मिनिमम प्रोग्राम यावर पक्षात सविस्तर मंथन सुरू आहे. पक्षाची मध्यवर्ती समिती संघटनात्मक पुनर्बांधणी पूर्ण झाल्यानंतरच आपली अधिकृत राजकीय भूमिका जाहीर करेल, असे त्यांनी नमूद केले. भाजप सरकारच्या धोरणांविरोधात लढा देणे हेच पक्षाचे मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गोवा विधानसभेचे कामकाज आता केवळ औपचारिकता; युरी आलेमाव यांची टीका

गोवा विधानसभेचे आगामी तीन दिवसांचे अधिवेशन म्हणजे केवळ एक औपचारिकता असल्याची तीव्र टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आज केली. बिझनेस ॲडव्हायझरी कमिटीच्या (BAC) बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राज्यपालांना व अध्यक्षांना पत्र लिहून अधिवेशन किमान १५ दिवसांचे घेण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली होती, मात्र सरकारने ती फेटाळून केवळ तीन दिवसांचेच अधिवेशन ठेवले. सध्या गोव्यात कायदा आणि सुव्यवस्थेची बिकट परिस्थिती असून तुरुंग, महिला, ज्येष्ठ नागरिक व कार्यकर्ते सुरक्षित नाहीत. सरकार महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा टाळून स्वतःचे काम पूर्ण करण्यासाठीच सभागृहाचा वापर करत आहे. विरोधी पक्षांचे प्रश्न व खाजगी सदस्यांचे प्रस्ताव पद्धतशीरपणे टाळले जात असून वर्षाला किमान ३० दिवस अधिवेशन चालवण्याच्या नियमाला हरताळ फासला जात आहे. सरकारच्या या मनमानी कारभारामुळे लोकशाहीचा घात होत असल्याचे आलेमाव म्हणाले.

काँग्रेसची सबुरीची भूमिका: 'एकसंध राहिलो तरच विजय', युरी आलेमांव यांचे मत

विरोधी पक्षांमधील एकंदरीत घडामोडींवर काल रात्री उशिरा विधानसभेचे विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका मांडली. गोवा फॉरवर्ड पक्षाने युतीबाबत घेतलेल्या भूमिकेचा काँग्रेस पूर्ण आदर करेल, असे सांगत त्यांनी विरोधी पक्षांच्या ऐक्यावर भर दिला. मुख्य विरोधी पक्ष या नात्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आम आदमी पक्ष आणि आरजीपीच्या नेतृत्वाशी युतीबाबत प्राथमिक चर्चा करत आहेत. 

'एकसंध राहिलो तरच विजय होईल, विभागलो तर पराभव अटळ आहे' या सूत्रावर भर देत आलेमांव म्हणाले की, वैयक्तिक व राजकीय मतभेद बाजूला ठेवून गोव्याच्या हितासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. मतदारांनी आगामी काळात त्रिशंकू कौल न देता स्पष्ट बहुमताचे सरकार निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. विधानसभेत जनतेच्या प्रश्नांवर सरकारला घेरण्यासाठी विरोधी पक्ष पूर्ण ताकदीने एकत्र काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.




हेही वाचा
सर्व पहा