इथेनॉलसाठी ऊस वापरल्याने साखर महागली

काँग्रेसचा मोदी सरकारच्या ई-२० धोरणावर निशाणा

Story: गोवन वार्ता । न्यूज डेस्क |
17 mins ago
इथेनॉलसाठी ऊस वापरल्याने साखर महागली

नवी दिल्ली : साखरेच्या वाढत्या किमती आणि वाढत्या महागाईवरून काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याच्या (ई-२० धोरण) अट्टहासामुळे साखर, गूळ आणि इतर अन्नधान्याचे भाव गगनाला भिडल्याचा थेट आरोप काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला आहे. या धोरणामुळे जनतेला स्वयंपाकघर आणि रस्त्यावरील प्रवास या दोन्हींमध्ये महागाईचा मोठा फटका बसत असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.
सुमारे २५ लाख टन साखरेचा ऊस इथेनॉल निर्मितीसाठी वळवण्यात आल्याने देशांतर्गत बाजारात साखरेचा तुटवडा निर्माण झाला आहे. गेल्या तीन महिन्यांत साखरेचे दर ४८ रुपयांवरून ६७ रुपये प्रति किलो, तर गुळाचे दर ५० रुपयांवरून ६५ रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. तांदूळ १६ टक्क्यांनी, मक्याचे पीठ ११ टक्क्यांनी आणि जनावरांच्या चाऱ्याचे दर १०.३४ टक्क्यांनी महागले आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या असताना आणि २० टक्के स्वस्त इथेनॉल मिसळले जात असतानाही पेट्रोलचे दर सर्वसामान्यांसाठी कमी का झाले नाहीत, असा सवाल रमेश यांनी उपस्थित केला. ई-२० पेट्रोलमुळे गाड्यांचे मायलेज कमी होत असून वाहनांच्या इंजिन अनुकूलतेबाबत गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. ग्राहकांना साध्या पेट्रोलचा पर्यायही उपलब्ध ठेवण्यात आलेला नाही.
केंद्राकडून शून्य शुल्कावर साखर आयात
वाढत्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने २० ऑगस्ट रोजी शून्य आयात शुल्कावर १० लाख मेट्रिक टन कच्ची साखर आयात करण्यास परवानगी दिली आहे. गेल्या दहा वर्षांत भारताने परदेशातून साखर आयात करण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. सध्या दिल्लीत साखर ६५ रुपये किलो दराने विकली जात आहे. काँग्रेसने मागणी केली आहे की, सरकारने ई-२० इंधन धोरणाचा तातडीने फेरविचार करावा आणि ग्राहकांसाठी शुद्ध पेट्रोलचा पर्याय उपलब्ध करून द्यावा.

हेही वाचा
सर्व पहा